Mon, Apr 22, 2019 16:45होमपेज › Belgaon › ...पाठ्यपुस्तकांचा प्रश्‍न सुटता सुटेना? 

...पाठ्यपुस्तकांचा प्रश्‍न सुटता सुटेना? 

Published On: Jul 21 2018 1:30AM | Last Updated: Jul 20 2018 7:55PMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील पाठ्यपुस्तकांचा प्रश्‍न काही सुटता सुटेना. मराठी, उर्दू माध्यमांच्या पुस्तकांचा तुटवडा आहे. शिक्षण खात्याकडून 91 टक्के पुस्तकांचा पुरवठा झाला असला तरी मराठी माध्यमांतील पहिली ते दहावीपर्यंतच्या प्रत्येक वर्गातील किमान एका विषयाची पुस्तके आलेली नाहीत. शाळा सुरू होऊन दोन महिने  व्हायला आले आहेत. मात्र, अध्यापही विद्यार्थ्यांच्या पुस्तकांचा प्रश्‍न सुटत नाही. शाळेत विद्यार्थ्यांना पुस्तकांविना शिकण्याची वेळ आली आहे. 

मराठी माध्यमाच्या पहिली ते चौथीपर्यंतच्या कन्नड पुस्तकाचा पत्ता नाही. तिसरीचे गणित भाग 2, चौथीचे गणित, पाचवीचे गणित भाग 2, सातवीचे समाज, गणित, विज्ञान व  शारीरिक (क्रीडा) शिक्षण, आठवीचे विज्ञान भाग 2, नववीचे गणित भाग 2, दहावीचे गणित, विज्ञान भाग 2 पुस्तके आली नाहीत. उर्दू माध्यमाचेही पहिली ते चौथीपर्यंतचे कन्नड पुस्तक आले नाही. आठवी ते दहावी समाज भाग 2, नववीचे गणित भाग 2 व दहावीचे गणित भाग 2 पुस्तके आलीच नाहीत. इंग्रजी माध्यमांचे पहिली ते चौथी पर्यंतच्या कन्नड पुस्तके आली नाहीत. विधानसभेच्या निवडणुकीमुळे पाठ्यपुस्तकांच्या छपाईवर परिणाम झाला आहे. इंग्रजी व  कन्नड माध्यमांची पाठ्यपुस्तके 98 टक्के पुस्तके आली आहेत. 

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यासाठी मोफत पुस्तके 18 लाख 73 हजार 827 आणि विक्रीसाठी 6 लाख 20 हजार 771 असून  एकूण 24 लाख 94 हजार 598 पाठ्यपुस्तकांची मागणी करण्यात आली आहे.  
शिक्षक मात्र मागील वर्षीच्या जुन्याच पुस्तकांचा आधार घेत आहेत. खानापूर दुर्गंम भागातील विद्यार्थ्यांना पुस्तकांचा पुरवठा करण्याची गरज होती. मात्र, मराठी माध्यमांच्या पुस्तकांचा तुटवडा अधिक आहे. ऑगस्ट महिन्यात पुस्तकांचा  पुरवठा  होईल, असे सांगण्यात येते. दरवर्षी  शिक्षण खाते अधिक पुस्तकांची मागणी करते. काही ठिकाणी पुस्तकांचा तुटवडा भासल्यास पुरवठा केला जातो. पण, शिक्षण खात्याने यंदा जादा पुस्तकांची मागणी केली नाही. त्यामुळेही पुस्तकांची समस्या उदभवत आहे. त्याशिवाय  आरटीई अंतर्गत खासगी शाळांमध्ये  प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही शिक्षण खात्यातर्फे मोफत पुस्तके पुरवठा केला आहे.