Sun, Jul 21, 2019 01:28होमपेज › Belgaon › बळ्ळारी नाला सर्व्हे करा, अतिक्रमण हटवा

बळ्ळारी नाला सर्व्हे करा, अतिक्रमण हटवा

Published On: Jul 03 2018 1:50AM | Last Updated: Jul 03 2018 12:07AMबेळगाव : प्रतिनिधी

कित्येक वर्षापासून बळ्ळारी नाल्यावर अतिक्रमण सुरु आहे. यामुळे बळ्ळारी नाल्याची रुंदी घटत असून अनेक समस्या उद्भवत आहेत. त्या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने सोमवार 2 रोजी बैठक घेऊन प्रथम सर्व्हे करा, त्याप्रमाणे सर्व अतिक्रमणे हटवावीत, असा आदेश बैठकीत बजावला.

बळ्ळारी नाल्यासंदर्भात वडगावातील शेतकरी संघटनेने जिल्हाधिकार्‍यापासून ते पतंप्रधानांपर्यंत तक्रारी केल्या आहेत. आतापर्यंत केवळ पाहणी करण्याचे नाटक प्रशासन व लोकप्रतिनिधींनी केले आहे. प्रत्यक्षात मात्र कुणीच अतिक्रमण हटविण्यासंदर्भात ठोस भूमिका घेतलेली नाही. यंदाच्या पहिल्या पावसातच बळ्ळारी नाल्याचे पाणी वाहून न जाता शिवारातच तुंबून राहिले. यामुळे  बळ्ळारी नाल्याच्या शेजारी शेती असलेल्या शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. 

बैठकीत जिल्हाधिकार्‍यांनी प्रांताधिकारी कविता योगपन्नवर, तहसीलदार मंजुळा नाईक यांना धारेवर धरून नकाशा मागवून बळ्ळारी नाल्याची पाहणी केली. नकाशाप्रमाणे  नाल्याचा सर्व्हे करा व त्याप्रमाणे अतिक्रमणे हटवा, असा आदेश दिला. बैठकीत जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी आर. रामचंद्रन यांनी संबंधित अधिकार्‍यांना उद्यापासूनच कामाला लागण्याची सूचना केली.बैठकीला शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू मरवे व इतर उपस्थित होते.

लोकायुक्त न्यायालयात आज सुनावणी

बळ्ळारी नाला अतिक्रमणासंदर्भात लोकायुक्तांकडे वडगाव भागातील शेतकर्‍यांनी दाद मागितली होती. त्याची सुनावणी आज 3 जुलै रोजी बंगळुरात होणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू मरवे यांनी ‘पुढारी’ला दिली.

बैठकीला बोलावले नाही...

नाल्यातील अतिक्रमणे हटविण्यासाठी जि. पं., ता. पं., महापालिका, तहसीलदार यांच्याकडे प्रकरण वर्ग झाले आहे. सध्या प्रकरण तहसीलदारांकडे असून नाल्याचा सर्व्हे होऊन अतिक्रमणे हटविण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. सोमवारी झालेल्या बैठकीला शेतकर्‍यांना बोलावून त्यांच्या समस्या जिल्हाधिकार्‍यांनी जाणून घ्यावयास हव्या होत्या. शेतकर्‍यांना अंधारात ठेवून बैठकीचे आयोजन केल्याने शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली.