Sun, Jul 21, 2019 09:59होमपेज › Belgaon › मराठा समाजाचा अंत पाहू नका

मराठा समाजाचा अंत पाहू नका

Published On: Jul 28 2018 1:32AM | Last Updated: Jul 28 2018 12:13AMखानापूर : वार्ताहर

गेल्या वर्षभरापासून सनदशीर मार्गाने आरक्षणाची मागणी करणार्‍या मराठा समाजाला न्याय मिळाला नाही. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात तसेच देश संरक्षणात महत्त्वाचा वाटा उचलणार्‍या समाजाला नेहमी वंचित रहावे लागले आहे. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. शूर असणार्‍या पण शांततेने मागणी करणार्‍या मराठा समाजाचा अंत पाहू नका, अन्यथा मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा मराठा नेत्यांनी प्रशासनाला दिला आहे. 

महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात तिघांनी बलिदान दिले आहे. या मोर्चाला  पाठिंबा तसेच हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी मराठा  समाजाच्या वतीने खानापुरात सभा आणि रास्तारोकोचे आयोजन करण्यात आले होते. 

शिवस्मारकातील शिवपुतळ्यास हार घालून मोर्चाला सुरवात केली. त्यानंतर सर्कलमध्ये अर्धातास रास्तारोको करुन महाराष्ट्र शासनाचा निषेध केला. मोर्चात हौतात्म्य पत्करलेल्या काकासाहेब शिंदे, जगन्नाथ सोनवने व रोहन तोडकर यांना श्रध्दांजली वाहिली. तसेच तहसिलदार शिवानंद उळागड्डी यांना कर्नाटकातील मराठा समाजालाही आरक्षण मिळावे, या आशयाचे निवेदन सादर केले.

मराठा समाजातील तरुणांत कौशल्य, गुणवत्ता  आहे. मात्र, आरक्षणाअभावी  वाताहत झाली आहे. आजही समाजातील गरीब घटकाला हात पसरावे लागतात. नोकरीची संधी न मिळाल्याने बेरोजगारीचा सामना करावा लागतो. ह्या समाजाने मूक मोर्चा काढून शासनासमोर आपल्या समस्या मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र जाणीवपूर्वक काणाडोळा करण्याचा प्रकार महाराष्ट्रातील सरकारने केला आहे. म्हणूनच आता ठोक मोर्चा हाती घेण्याची वेळ आली आहे, असे विचार नगराध्यक्ष तसेच शिवसेनेचे तालुकाध्यक्ष नारायण मयेकर यांनी व्यक्त केले.

मोर्चात महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष देवापान्ना गुरव, गोपाळ पाटील, गोपाळराव देसाई, मारुती परमेकर, विठ्ठल बेळगावकर, पी.एच.पाटील, दिनकर मरगाळे, श्रीरामसेनेचे किरण तुडवेकर, पंकज कुट्रे, संजय गुरव आदींसह समाजबांधव मोठ्या संख्यने उपस्थित होते.