Wed, May 22, 2019 11:03होमपेज › Belgaon › भूमिगत केबलचा ड्रेनेजला अडथळा नको

भूमिगत केबलचा ड्रेनेजला अडथळा नको

Published On: Aug 03 2018 1:33AM | Last Updated: Aug 03 2018 12:05AMबेळगाव : प्रतिनिधी

हेस्कॉमकडून सध्या शहरातील मुख्य मार्गावर भूमिगत केबल घालण्याचे काम सुरू आहे. सदर केबल ड्रेनेज पाईपच्या बाजूने घालण्यात येत आहे. यामुळे भविष्यात दुर्घटना घडल्यास याचा फटका मनपाला बसण्याची शक्यता आहे. यामुळे हेस्कॉमला ना हरकत दाखला देण्यात येऊ नये, अशी सूचना नगरसेवकांनी मनपा बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीत केली.गुरुवारी मनपा सभागृहात बांधकाम स्थायी समितीची बैठक अध्यक्ष मोहन भांदुर्गे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपरोक्त चर्चा करण्यात आली.

भूमिगत मार्गासाठी हेस्कॉमकडून रस्ते खोदाई जोरात सुरू आहे. यामुळे भविष्यात समस्या उद्भवू शकते. यासाठी खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. भूमिगत केबल ड्रेनेजपाईपच्या बाजूने घालण्यात येत आहे. याचा धोका भविष्यात येऊ शकतो. यामुळे हेस्कॉमला परवानगी देताना सावधानता बाळगावी, असे सदस्यांनी सूचविले.

अध्यक्ष मोहन भांदुर्गे म्हणाले, बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघात दक्षिण मतदारसंघाच्या तुलनेत स्ट्रीटलाईट अधिक प्रमाणात बसविण्यात आले आहेत. यामुळे या भागात स्ट्रीटलाईटची कोणतीही समस्या नाही. मात्र दक्षिण मतदारसंघातील प्रभागाकडे दुर्लक्ष झालेले आहे. उत्तर मतदारसंघातील प्रत्येक प्रभागात पंधरा स्ट्रीटलाईट बसविले आहेत. दक्षिण भागावर अन्याय झालेला आहे. यामुळे काही नगरसेवकांनी स्वखर्चानी स्ट्रीट लाईट बसविल्याचे सांगितले.

यावर कौन्सिल सेक्रेटरी लक्ष्मी निपाणीकर यांनी शहरातील सर्वच प्रभागासाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. उत्तर भागातील नगरसेवकांनी आपला प्रस्ताव दिल्याने या भागात अधिक स्ट्रीट लाईट उभे आहेत. येत्या काळात ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, त्याठिकाणी स्ट्रीट लाईट उभारण्यास प्राधान्य देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी उपनगरांत वाढत्या वसाहतींचा प्रश्‍न उपस्थित केला. उपनगरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वसाहती वाढत आहेत. त्यांना नियमित करून घेण्यासाठी विकास कर भरून घेतल्यास त्याचा लाभ मनपाला होईल. यातून मनपाच्या उत्पन्नात भर पडेल, असा प्रस्ताव सादर केला. मात्र अधिकार्‍यांनी यामुळे अनधिकृत वसाहती वाढण्यास मदत होणार असल्याची माहिती दिली.

बैठकीत विकासकामांना आणि मागील बैठकीच्या इतिवृत्ताला मंजुरी देण्यात आली. उपमहापौर लक्ष्मी निपाणीकर, माया कडोलकर, दिनेश नाशीपुडी आदींसह सदस्य, अधिकारी यावेळी उपस्थित होते.