Tue, May 21, 2019 18:26होमपेज › Belgaon › हैवान बनू नका, माणुसकी जपा

हैवान बनू नका, माणुसकी जपा

Published On: Jul 03 2018 1:50AM | Last Updated: Jul 03 2018 12:14AMबेळागाव : प्रतिनिधी

सोशल मीडियावरील खोट्या संदेशांमुळे अनेक अहितकारक घटना घडण्यास कारणीभूत ठरत आहेत. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात या खोट्या संदेशांमुळे पाच जणांना जीव गमवावा लागला आहे. देशामध्ये विविध घटनात महिनाभरात 30 जणांना अशा खोट्या संदेशांमुळे जीव गमवावा लागला आहे. अशा घटना रोखण्यासाठी प्रशासनाने गंभीर दखल घेतली पाहिजे. तसेच नागरिकांनी कायदा हातात घेण्यापूर्वी विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

सोशल मीडियाचा ज्याप्रमाणे चांगल्या कामासाठी उपयोग केला जात आहे. तितकाच समाजात अपप्रचार पसरविण्यासाठी त्याचा दुरूपयोग केला जात आहे. यामुळे अनेक जणांना नाहक जीव गमवावा लागला आहे. मुले पळविणारी टोळी असल्याच्या संशयातून धुळे येथे ग्रामस्थांनी पाच जणांना जबर मारहाण करून ठेचून  ठार मारले. रविवार घडलेल्या या दुर्दैवी घटनेत पाच जणांचा नाहक बळी गेला आहे. 

सदर घटना देशातील पहिलीच घटना यापूर्वी  अशा घटना घडल्या आहेत. गेल्या महिनाभराच्या काळात देशामध्ये विविध राज्यात अशा घटनांमधून 30 जणांचा बळी गेला आहे. सदर घटना या केवळ फेक मेसेजीसमुळे घडल्या असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे सोशल मीडियाचा वापर करणार्‍यांनी मेसेज फॉरवर्ड करण्यापूर्वी त्याची शहानिशा करून खातरजमा करून घेणे गरजेचे बनले आहे. एका व्यक्तीकडून आलेला मेसेज तसाच दुसर्‍या व्यक्तीला फॉरवर्ड करणे. या पद्धतीमुळे अफवांना व खोट्या बातम्या पसरत आहेत. 

व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकच्या  माध्यमातून अशा खोट्या बातम्या पसरविल्या जात आहेत. याबरोबरच खोटे व समाजात अपप्रचार पसरविणारे व्हीडीओही पाठविले जात आहेत. यामुळेच अशा घटना घडण्याच कारणीभूत ठरत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या संदेशांवर कितपत विश्‍वास ठेवावा, याचा विचार वापरकर्त्यांनी करणे गरजेचे बनले आहे. व्हॉट्सअपचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. यामुळेच अनेक खोट्या बातम्या पसरविल्या जात आहेत. अशा खोट्या बातम्यांमुळेच समाजात असे गुन्हे घडत असल्याचा आरोप नागरिकांतून करण्यात येत आहे. यावर रोख लावला पाहिजे. खोट्या बातम्या पसरवून समाजात अशांतता निर्माण करणार्‍यांवरही कडक कार्यवाही केली पाहिजे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. 

देशभरात 30 बळी 

सोशल मीडियावरील खोट्या बातम्यांमुळे आतापर्यंत देशभरात 30 जणांचा बळी गेला आहे. महाराष्ट्रात 8, झारखंड 7, तेलंगणा 2, त्रिपुरा 2, कर्नाटक 2, आसाम 2, गुजरात 1, पश्‍चिम बंगाल 1, आंधप्रदेश 1 तर मध्यप्रदेशमध्ये एकाचा बळी गेला आहे.