Tue, Mar 26, 2019 02:22होमपेज › Belgaon › जलतरणात स्वर्णभरारी !  

जलतरणात स्वर्णभरारी !  

Published On: Jan 02 2018 12:58AM | Last Updated: Jan 01 2018 11:32PM

बुकमार्क करा
बेळगाव : श्रीकांत काकतीकर

कमीपणातच यशाचे गमक असते. ज्याला हा मूलमंत्र गवसला तोच  यशाचा गौरीशंकर उभा करतो. बेळगावचा राघवेंद्र रत्नाकर अणवेकर हा यातलाच. जन्मजात पायाने अधु असताना त्याने अपंगत्वावर जिद्दीने मात करून जलतरणात मिळविलेल्या कौशल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तुंग झेप घेतली. नव्या वर्षात पदार्पण करताना राघवेंद्रने यशाला घातलेली गवसणी थक्‍क करणारी  आहे. 

वडगावातील छोट्या भाड्याच्या घरात आणि गरीब कुटुंबात जन्माला आलेला राघवेंद्र जन्मत:च पायाने अधु. वडील रत्नाकर तांब्याचे काम करत होते. आईला आपल्या मुलाला शिकवण्याची आस होती. राघवेंद्रला शाळेत प्रवेश मिळत नव्हता. अथक प्रयत्नातून सरकारी शाळेत मिळाला. राघवेंद्रची आई पाचवीपर्यंत त्याला पाठीवर बसून शाळेला घेऊन जात असे.

2000 साली शहापूर अळवाण गल्लीतील फिजिकल हँडिकॅप्ड संस्थेत राघवेंद्र सहभागी झाला. त्याला शकुताई परांजपे यांचे मार्गदर्शन मिळू लागले. डॉ. पावसकर यांच्या प्रोत्साहनातून राघवेंद्रने गोवावेसच्या रोटरी जलतरण तलावात धडे घ्यायला सुरुवात केली. स्विमर्स क्‍लबचे उमेश कलघटगी यांचे राघवेंद्रला बहुमोल मार्गदर्शन मिळाले. अल्पावधीतच राघवेंद्रचे जलतरण कसब दिसायला लागले. गदग येथे झालेल्या 2001 च्या निमंत्रितांच्या राष्ट्रीय दिव्यांग जलतरण स्पर्धेत एक सुवर्ण, दोन रौप्य व एका कांस्यपदकाची कमाई केली. पहिल्याच स्पर्धेत मिळविलेल्या यशानंतर राघवेंद्रचा उत्साह दुणावला. 

आठवीत असताना 2002 साली ग्वाल्हेर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रशिक्षक प्रसाद तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला जलतरण सरावाची संधी मिळाली. स्पर्धेसाठी कर्नाटकात स्विमिंग असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी एस. आर. सिंदीया, हुबळीच्या भारती कोठारी यांचे सहकार्य मिळाले. या स्पर्धेत राघवेंद्रने चार सुवर्णपदकांसह ‘बेस्ट मेल स्विमर्स ऑफ द मीट’ हा किताबही मिळविला. 

जलतरणात वाटचाल करत असताना दुसर्‍या बाजूला राघवेंद्रने अभ्यासातील लक्ष विचलित होऊ दिले नाही. माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर त्याने कलाशाखेची पदवी मिळविली. 2003 साली हाँगकाँग येथील ‘फ्रेस्ट्रीक यूथ गेम्स’मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यात आशिया खंडातील स्पर्धकांचा सहभाग होता. यातही राघवेंद्रने तीन रौप्य व तीन कांस्य पदकांची कमाई केली. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेत असतानाच जलतरणपटूला इंग्लिश खाडी पार करण्याची दुर्दम्य इच्छा असते. यासाठी भल्याभल्यांची कसोटी लागते. अधु असलेल्या राघवेंद्रने इंग्लिश खाडी पोहण्याचा निश्‍चय केला. 

2009 साली बंगळूर येथे झालेल्या ‘हायवर्ल्डस गेम्स’ स्पर्धेत राघवेंद्रने दोन रौप्य व दोन कांस्यपदके पटकाविली. 2012 साली लंडन येथे झालेल्या ‘पॅरा ऑलिम्पिक कोचिंग कॅम्प’साठी त्याची निवड झाली. या स्पर्धेत त्याला चांगला अनुभव मिळाला. चीनमध्ये झालेल्या ‘एशियन गेम्स’ स्पर्धेत त्याने कांस्यपदक पटकाविले.  

अपंगावर मात करत राघवेंद्रने जीवनदिशा निश्‍चित केली. यशाची अनेक शिखरे पार केली. सध्या तो राणी चन्नम्मा विद्यापीठात सेकंड डिव्हिजन असिस्टंट म्हणून काम करीत आहे. जलतरण सराव करत असतानाच ‘केएलई’ इंटरनॅशनल स्कूलमध्ये सकाळी नवोदितांना प्रशिक्षण देत असतो.