Sat, Jul 20, 2019 10:58होमपेज › Belgaon › वाचवा पावसाचा प्रत्येक थेंब...

वाचवा पावसाचा प्रत्येक थेंब...

Published On: Jun 01 2018 1:43AM | Last Updated: May 31 2018 8:15PMबेळगाव : प्रतिनिधी 

वाढती लोकसंख्या, जंगलांची होणारी बेसुमार कत्तल यामुळे वातावरणात मोठा बदल झाला असून, नदी-नाल्यांचे पाणी आटून जात आहे.  त्यामुळे पावसाचा प्रत्येक थेंब वाचवण्याचे आवाहन जिल्हा पंचायतीने केले आहे. केंद्राच्या जलामृत योजनेत बेळगाव जिल्हा आघाडीवर असून, त्या लौकिकाला साजेसे कार्य झाले पाहिजे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत बेळगाव जिल्ह्यात 2015-16 मध्ये ‘जलामृत’ योजना राबविण्यात आली. या योजनेअंतर्गत पाण्याचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. हा उपक्रम यशस्वी ठरला असून यासाठी बेळगाव जिल्हा पंचायतीला 2017-18 मध्ये राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

जिल्ह्यामध्ये बहुतांश लोक कृषी व्यवसायावर अवलंबून असल्यामुळे शेतकर्‍यांची संख्या अधिक आहे. कृषी क्षेत्राच्या विकासावर भर देऊन ही योजना राबविण्यात येत आहे. कृषी क्षेत्रासाठी भासणारी पाण्याची कमतरता दूर करण्याच्या उद्देशाने जलामृत योजना हाती घेण्यात आली आहे. 

उंचावरून येणारे पाणी नदीनाल्यातून वाहत जाणार्‍या पाण्याचा योग्य प्रकारे उपयोग करून घ्यावा. यासाठीच सदर योजना राबविण्यात येत आहे. उंचावरून येणार्‍या पाण्याबरोबर माती व इतर गाळही येतो. याचा कृषी क्षेत्राच्या विकासासाठी योग्य उपयोग करून घेण्याच्या उद्देशाने सदर योजना राबविण्या येत आहे.

अतिवृष्टीमुळे जमिनीची धूप होते. यामुळे जमिनीचा पोतही घसरतो. पीरणामी उत्पादनात घट होते. वाढत्या अन्नधान्याची मागणी लक्षात घेतल्यास तसेच जनावरांच्या चार्‍याची मागणी लक्षात घेऊन ही स्थिती सुधारण्यासाठीच जलामृत योजना हाती घेण्यात आली आहे.  या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील जनतेला 100 दिवस काम देण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे.  दिवसाला  246 रुपये वेतन देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सर्वाधिक प्रमाणात नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा मान जि.पं. ला लाभला आहे.