Mon, Aug 19, 2019 05:15होमपेज › Belgaon › जि. पं. अध्यक्षांवर फसवणुकीचा आरोप

जि. पं. अध्यक्षांवर फसवणुकीचा आरोप

Published On: Sep 07 2018 1:04AM | Last Updated: Sep 06 2018 10:32PMबेळगाव : प्रतिनिधी

जि. पं. अध्यक्षा आशा ऐहोळे आणि त्यांचे पती प्रशांत ऐहोळे यांनी महालक्ष्मी मल्टिपर्पज आणि डिस्ट्रिक्ट प्रायव्हेट लि. च्या माध्यमातून स्वीकारलेल्या लाखो रुपयांच्या ठेवी देण्यास नकार दिला आहे. यामुळे ऐहोळे दांपत्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी जि. पं. कार्यालयावर गुरुवारी ठेवीदारांनी मोर्चा काढला. मात्र, अध्यक्षा ऐहोळे यांनी संबंधित संस्थेशी आपला कोणताही संबंध नसल्याचा खुलासा केला आहे.

ठेवीदारांनी जि. पं. कार्यालयासमोर ठिय्या मारून आंदोलन केले. ऐहोळे यांनी संस्थेच्या माध्यमातून स्वीकारलेल्या आपल्या ठेवी परत कराव्यात, अशी मागणी केली. त्याचबरोबर त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी आर. रामचंद्रन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. 

महालक्ष्मी मल्टिपर्पज संस्थेच्यावतीने बेळगाव, कोल्हापूर, चिकोडी, विजापूर, निपाणी, रामपूर, पट्टणकुडी परिसरातील नागरिकांकडून ठेवी स्वीकारल्या आहेत. परंतु, त्याचे व्याज अथवा मूळ रक्‍कम देण्यास सध्या नकार देण्यात येत आहे. पैशाची मागणी करणार्‍या ठेवीदारांना प्रशांत ऐहोळे हे अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत आहेत, असा आरोप निवेदनामध्ये केला आहे. 

ठेवीदारांनी जि. पं. समोर जोरदार घोषणाबाजी केली. कार्यालयासमोर ठाण मांडून आंदोलन छेडले. यामुळे अध्यक्षा आशा ऐहोळे यांनी आंदोलकांची भेट घेतली. आपला व महालक्ष्मी मल्टिपर्पज संस्थेचा संबंध नसल्याचा खुलासा केला. सदर संस्थेच्या संचालक पदाचा 2010 मध्ये राजीनामा दिला असून संस्थेतील ठेवीबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे सांगितले. आपल्यावर खोटे आरोप केल्यास कायदेशीर कारवाई करावी लागेल असा इशारा दिला.