Thu, Jul 09, 2020 06:58होमपेज › Belgaon › गरिबांना डावलून बीपीएल रेशनकार्डांचे वितरण 

गरिबांना डावलून बीपीएल रेशनकार्डांचे वितरण 

Published On: Jun 16 2018 1:28AM | Last Updated: Jun 15 2018 11:12PMबेळगाव : प्रतिनिधी

गोरगरिबांना डावलून श्रीमंतांना बीपीएल रेशनकार्डे वितरित करण्यात आली आहेत. त्याची सखोल चौकशी करण्यात यावी आणि रेशनकार्ड वितरण प्रक्रिया त्वरित सुरू करावी, अशी मागणी तालुका पंचायत बैठकीमध्ये सदस्यांकडून करण्यात आली. 

बैठकीच्या अध्यक्षस्थानी ता. पं. शंकरगौडा पाटील होते. एकाच उत्पन्नाच्या दाखल्यावर अनेकजणांना बीपीएल रेशनकार्डे वितरण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. यावरून अन्न व नागरीपुवरठा खात्यातील दोघा कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. या घटनेमुळे अन्न व नागरीपुरवठा खात्याने रेशनकार्ड वितरणालाही स्थगिती दिली आहे. अशाप्रकारच्या घटना राज्यात अनेक ठिकाणी घडल्या आहेत. यामुळेच निवडणुकीच्या आचारसंहितेदरम्यान स्थगित करण्यात आलेली रेशनकार्ड वितरण प्रक्रिया अद्यापही ठप्प आहे. 

याबाबत अन्न व नागरीपुरवठा खात्याच्या अधिकार्‍यांना विचारण्यात आले असता सदर प्रक्रिया येत्या 15 दिवसांत पूर्ववत सुरू करण्यात येईल, अशी माहिती दिली. तालुक्यामध्ये अद्याप 2,094 रेशनकार्डे वितरण करणे शिल्लक आहे. मात्र घडलेल्या प्रकारामुळे सदर प्रक्रिया चौकशीच्या फेर्‍यात अडकल्याचे तालुका अन्न व नागरीपुरवठा खात्याच्या अधिकार्‍यांनी सांगितले. 

कडोली ग्रा. पं. ची चौकशीची मागणी

कडोली ग्रामपंचायतीअंतर्गत वितरित करण्यात आलेल्या आश्रय घरांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. 85 घरांच्या वितरणात गैरकारभार करण्यात आला आहे. याबाबत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊनही कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. 

22 हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी

तालुक्यामध्ये सरासरीपेक्षा 30 टक्के अधिक पाऊस झाला आहे. त्यानुसार तालुक्यात 48  हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 22 हजार 895 हेक्टर क्षेत्रात पेरणी करण्यात आली आहे. रयत संपर्क केंद्र व सहकारी सोसायटींच्या माध्यमातून 4  हजार 754 क्विंटल सोयाबीन बियाणाचे वितरण, 180 क्विंटल भात बियाणाचे वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी जी. बी. कल्याणी यांनी दिली. तसेच शेतकर्‍यांसाठी ताडपत्री, अवजारे सवलतीच्या दरात उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली. 

बँकांकडून शेतकर्‍यांना त्रास

सरकारकडून शेतकर्‍यांसाठी सवलतीच्या व्याजदरात कर्ज वितरण करण्यात येत असले तरी बँकांकडून शेतकर्‍यांना कागदपत्रांसाठी पळापळ केली जात आहे. बँक अधिकार्‍यांकडून शेतकर्‍यांना त्रास देण्यात येत आहे. याकडे लक्ष देण्यात यावे. शेतकर्‍यांच्या समस्या दूर करून सहकार्य  करण्यात यावे, अशी मागणीही नारायण नलवडे, यल्लाप्पा कोळेकर आदी सदस्यांनी केली. 

अंगणवाडी दुरुस्तीसाठी 20 लाख 

तालुक्यामध्ये 674 अंगणवाडी आहेत. यामध्ये 255 अंगणवाडी सरकारी जागेमध्ये आहेत. तर उर्वरित मंदिर, ग्रामपंचायत आदी ठिकाणी आहेत. यामधील 43 अंगणवाडींच्या दुरुस्तीसाठी सरकारकडून 20 लाख 50 हजार निधी मंजूर झाला आहे. प्रत्येक अंगणवाडीला गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती महिला आणि बालकल्याण खात्याच्या अधिकार्‍यांनी दिली. यावेळी अनेक सदस्यांनी सदर खात्याच्या कारभारावर अक्षेप घेत अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या  भ्रष्टाचारावरही प्रश्‍न उपस्थित केला.