Thu, Jun 27, 2019 15:45होमपेज › Belgaon › बंदमुळे वाहतूक सेवा विस्कळीत

बंदमुळे वाहतूक सेवा विस्कळीत

Published On: Sep 11 2018 1:36AM | Last Updated: Sep 10 2018 11:23PMबेळगाव : प्रतिनिधी

भारत बंदमध्ये वाहतूक संघटना सहभागी झाल्या होत्या. याचा फटका बाजारपेठेला बसला. ग्रामीण ग्राहक बाजारपेठेकडे फिरकला नाही. काँग्रेसने मोर्चा काढून केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध केला. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

गणेशोत्सव दोन दिवसावर आहे. नागरिकांना बंदचा फटका बसला. मंगळवारी शहराची बाजारपेठ बंद असते. परिणामी ग्रामीण भागातील नागरिक सोमवारी प्रामुख्याने बाजारासाठी शहराकडे धाव घेतात. बंदमुळे नागरिकांचा हिरमोड झाला. ग्रामीण बससेवा सोमवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी तुरळक गर्दी होती.

काँग्रेस, निजद, आपच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून पेट्रोल दरवाढीचा निषेध केला. इंधन दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. वाढत्या महागाईने सामान्यांचे आर्थिक गणित बिघडल्याचा आरोप करत दरवाढ त्वरित कमी करण्याची मागणी आंदोलकांनी केली. 

बंदमध्ये राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचारी संघटना सहभागी झाल्या होत्या. यामुळे नेहमी गजबजलेल्या मध्यवर्ती व शहर बसस्थानक परिसरात शुकशुकाट होता. बसेस डेपोमध्ये लावण्यात आल्या होत्या. बाहेरून आलेल्या प्रवाशांना दिवसभर स्थानकावर ताटकळत बसावे लागले. रिक्षा बंदमुळे प्रवाशांना पायपीट करावी लागली.

चंदगड, आजरा परिसरातून येणार्‍या बसेस युनियन जिमखान्यापर्यंत येत होत्या. वडापदेखील सुरळीत सुरू होते. बंदची घोषणा करण्यात आल्याने चंदगड परिसरातून येणार्‍या प्रवाशांनी बेळगावला येणे टाळले. शाळा, महाविद्यालये बंद असल्याने शहरातील वर्दळ कमी होती. शाळा, महाविद्यालय, रिक्षास्थानक परिसरात शुकशुकाट दिसला. सायंकाळनंतर सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले.