बंगळूर : प्रतिनिधी
मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी पक्षाच्या कार्यक्रमात अश्रू ढाळले होते. शिवाय, आपण विषकंठ असून विष प्राशन करून राज्याला अमृत देत असल्याचे विधान केले होते. यावरून काँग्रेसमधून जोरदार टीका होत आहे. तर निजद आमदारांनी मुख्यमंत्र्यांचे समर्थनकेले आहे. ‘आपल्याला विष देत आहेत,’ असे विधान मुख्यमंत्र्यांनी केले आहे. त्यावर समन्वय समितीचे अध्यक्ष सिद्धरामय्यांनी निकटवर्तीयांजवळ तीव्र नाराजी व्यक्त केली. या विधानाने जनतेला चुकीचा संदेश जातो. अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर त्यांनी हा आरोप केल्याचे दिसून येते. उपमुख्यमंत्री परमेश्वर यांनी त्यांना याबाबत जाब विचारावयास हवा, असे मत सिद्धरामय्यांनी निकटवर्तीयांपुढे व्यक्त केल्याचे समजते.
हासन जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते ए. मंजू यांनी कुमारस्वामींना आपण विष दिलेले नाही, सत्तारूपी अमृत त्यांना दिल्याचे सांगितले. आघाडी सरकार म्हणजे एक संसार आहे. केवळ मुलगी सुखात नांदावी, अशी आशा करणे चुकीचे आहे. जावईही सुखात रहावा, अशी अपेक्षा करावी. आघाडी असली तरी काँग्रेसच्या खांद्यावर बंदूक ठेवणे योग्य नाही, असे ए. मंजू यांनी म्हटले आहे.
तथापि, निजदचे ज्येष्ठ नेते आणि पशुसंगोपन मंत्री व्यंकटराव नाडगौडा यांनी मुख्यमंत्र्यांनी अश्रू ढाळल्याचे समर्थन केले आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकर्यांची कर्जमाफी केली आहे. शेतकरी तसेच इतर लोकांसाठी त्यांनी अनेक योजनांसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. त्यानंतरही काहीजण त्यांच्यावर टीका करत आहेत. अशा परिस्थितीत कुमारस्वामींनी करावयाचे तरी काय, असा प्रश्न मंत्री नाडगौडा यांनी केला.