होमपेज › Belgaon › कलंकितांना कौल देण्याची मतदारांवर नामुष्की

कलंकितांना कौल देण्याची मतदारांवर नामुष्की

Published On: May 09 2018 1:50AM | Last Updated: May 08 2018 8:37PMबंगळूर : प्रतिनिधी  

बेकायदा खाणउद्योगासाठी संपूर्ण जगाचे लक्ष वेधलेल्या जिल्ह्यात भ्रष्टाचारावर बोलणारे आता मोजकेच आहेत. काँग्रेस, भाजप आणि निजदने बेकायदा खाणउद्योगाचा डाग असणारे उमेदवार येथे रिंगणात उतरवले आहेत. काही ठिकाणी झालेले पक्षांतर, रेड्डींविरोधातील रोष याबाबत चर्चा असली तरी भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होणार आहे.बळ्ळारी शहर मतदारसंघातून निजदचे टपाल गणेश आणि संडूरमधून एसयुसीआयसीचे रामांजनप्पा यांना वगळता कोणत्याही उमेदवाराने खाणउद्योगामुळे झालेले जनतेचे नुकसान त्यापासून बचावासाठी उपाययोजनेचा मुद्दा निवडणुकीत मांडलेला नाही. रामानंजप्पा या मुद्द्याचा अस्त्रासारखा उपयोग करत आहेत. मात्र, रेड्डी बंधूंच्या दरार्‍यामुळे टपाल गणेश यांच्यासोबत जाण्यास मतदारांची पीछेहाट होत असल्याचे दिसून येते. 

पाच वर्षांपूर्वी सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी नेहमीच बळ्ळारीतील खाणउद्योजकांवर हल्‍लाबोल केला. मात्र, भाजपमधून काँग्रेसमध्ये पक्षांतर केलेले माजी मंत्री आनंद सिंग यांना त्यांनी विजयनगरातून उमेदवारी दिली आहे. या पक्षांतरानंतर एच. आर. गवीयप्पा यांनी भाजपप्रवेश केला आणि त्यांना विजयनगरातून उमेदवारी देण्यात आली. आनंद सिंग यांचा चुलत भाऊ दीपक सिंग निजद उमेदवार आहेत.

जिल्ह्यात पक्षनिष्ठेची बाबतीत कार्यकर्त्यांत चर्चा आहे. पक्षांतर केल्यानंतर संबंधितांना उमेदवारी दिल्याने नाराजी असली तरी कोठेही बंडखोरी नाही. बळ्ळारी शहर मतदारसंघात काँग्रेसचे अनिल लाड आणि निजदचे महम्मद इक्बाल होतूर या दोघांवरही बेकायदा खाणउद्योगाचा आरोप आहे.भाजप उमेदवार जी. सोमशेखर रेड्डी यांच्यावर  जामिनासाठी न्यायमूर्तींना लाच दिल्याचा आरोप आहे. भाजपचे आणखी एक उमेदवार टी. एच. सुरेशबाबू कंपलीतून रिंगणात आहेत.

रेड्डी बंधूंसोबत राजकारणात वाढलेले बी. नागेंद्र यांना काँग्रेसने बळ्ळारी ग्रामीणमधून रिंगणात उतरवले ओह. 2014 मध्ये पोटनिवडणुकीत काँग्रेसतर्फे एन. वाय. गोपालकृष्ण विजयी झाले होते. पुन्हा तेथून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी आमदारपदाचा राजीनामा दिला. आता ते भाजपतर्फे कोडलीगी येथून निवडणूक लढवत आहेत. बी. श्रीरामुलू आणि जनार्दन रेड्डी त्यांच्या पाठीशी आहेत. मात्र, निजद उमेदवार एन. टी. बेाम्मण्णा यांच्याकडे मतदारांचा कल आहे. जिल्ह्यात निजदचा फारसा प्रभाव नसला तरी बोम्मण्णा यांना मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे आशा वाढली आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या हगरीबोम्मनहळ्ळी आणि हडगली येथे मादिग जातीतील नेत्याला उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, काँग्रेस आणि भाजपने त्याकडे दुर्लक्ष केले. निजदने के. पुत्रप्पा यांना हगरीबोम्मनहळ्ळीतून उमेदवारी देऊन आता त्यांच्या पाठिंब्याची वाट पाहात आहे. निजदचे विद्यमान आमदार आणि काँग्रेसमधून उमेदवारी मिळालेले एल. बी. पी. भीमानायक यांना धडा शिकविण्याच्या पवित्र्यात निजद कार्यकर्ते आहेत. त्यादृष्टीने डावपेच आखण्यात येत आहेत. यामुळे निजदच्या निकालावर परिणाम शक्य आहे.

श्रीरामुलूंना वेळच नाही

संडूर येथे रिंगणात असलेले काँग्रेस आमदार ई. तुकाराम यांचे प्रतिस्पर्धी डी. राघवेंद्र यांनी काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसचा त्याग केला होता. बदामी आणि मोळकाल्मुरू अशा दोन ठिकाणी निवडणूक लढवत असलेले खासदार श्रीरामुलू यांना बळ्ळारीत प्रचारासाठी वेळ नाही. बंधू जनार्दन रेड्ढी यांना प्रचारासाठी आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र, परवानगी मिळाली नाही.