Sun, Jul 21, 2019 16:14
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › घरावर कर्ज, मुलगा मतिमंद, सांगा कुठे जायचं?

घरावर कर्ज, मुलगा मतिमंद, सांगा कुठे जायचं?

Published On: Feb 23 2018 1:19AM | Last Updated: Feb 22 2018 11:40PMबेळगाव  ; प्रतिनिधी

आयुष्यभर काबाडकष्ट करूनही मूलभूत गरजा भागत नसल्याने कर्ज काढून डोक्यावर छत उभारले. अद्याप एक लाखाचे कर्ज बाकी आहे. त्याचे हप्ते भरावे लागतात. अशातच वृद्ध मातेचा कॅन्सरने मृत्यू झाला. मुलगा मतिमंद. त्याच्या औषधोपचारासाठी महिना दोन हजाराहून अधिक खर्च, महिन्याचा पगार केवळ 6 हजार. अशा प्रतिकूल परिस्थितीत  गण्यासाठी झुंज देत आहोत. मनपा स्मार्ट सिटीसाठी घरावर बुलडोझर चालविणार असल्यामुळे आम्ही कुठे जायचं, असा प्रश्‍न उभा ठाकला आहे. 

टिळकवाडीजवळील अयोध्यानगर रस्ता रुंदीकरणामुळे येथील 16 जणांच्या घरावर हातोडा फिरविण्यात येणार आहे. तूर्तास धारवाड खंडपीठाने त्यांना दिलासा दिला असला तरी संकटाची तलवार आहेच. येथील रहिवाशांचा विचार करून मनपाने योग्य निर्णय घ्यावा, अशी विनवणी दिलीप कोल्हापुरे यांनी केली आहे. दै. ‘पुढारी’कडे कोल्हापुरे म्हणाले, या ठिकाणी सुमारे 68 वर्षांपासून रहिवासी राहतात.

काही महिन्यापासून महापालिका स्मार्ट सिटी योजनेंतर्गत 60 फुटाचा रस्ता असतानाही 80 फुटाचा करणार आहे. याला धारवाड खंडपीठाची स्थगिती आहे. यानंतरही आमच्यावर संकट उभे राहणार आहे. यासाठी मनपाने रस्तारुंदी करू नये किंवा रस्ता इतर ठिकाणी वळवावा, यासाठी निवेदने दिली  आहेत. अयोध्यानगरात माझे घर असून परिस्थिती हलाखीची आहे. मी उद्यमबागेत खासगी कारखान्यात कामाला जातो. यातून दरमहा 6 हजार रु. मिळतात. काही वर्षापूर्वी कॅन्सरने त्रस्त आईचे निधन झाले. घरावर कर्ज आहे. मुलगा साई (18) मतिमंद असून औषधासाठी मासिक 2 हजार रुपये खर्च येतो. 6 हजार पगारात घर चालविणे व बँकेचे कर्ज फेडणे कठीण होते. मनपाने कारवाई करून रस्ता रुंदीत घराचे नुकसान झाले तर आमचे छत हरवणार आहे.

घर, दुकान उद्ध्वस्त होण्यापासून वाचवा  :  पिंगळे यांचे निवेदन

अयोध्यानगरात मनपातर्फे रस्त्याचे 80 फूट रुंदीकरण करण्यात येणार आहे. यात 16 जणांच्या घराचे नुकसान होणार आहे. यासंबंधी 22 फेब्रुवारीला दै. ‘पुढारी’मध्ये निवृत्त जवान करणार दयामरणाचा अर्ज या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली होती. यानंतर येथील रहिवाशांनी कॅम्प येथील माजी सैनिक असोसिएशनला निवेदन देऊन निवृत्त जवान प्पासाहेब पिंगळे व येथील रहिवाशांच्या सद्यस्थितीची जाणीव करून दिली. निवेदनात म्हटले आहे की, मी 1963 ते 1979 या काळात भारतीय सेनेत होतो. देशसेवेसाठी मी कार्य केले आहे. निवृत्तीनंतर अयोध्यानगरात छोटेसे घर बांधले.

या काळात माझ्या मुलाचे निधन झाले. पत्नी, सून व दोन नातवंडे यांची पूर्ण जबाबदार माझ्यावर आली. पेन्शन व किराणा दुकानावर घरखर्च चालवतो. महापालिका 80 फुटाचा रस्ता करणार आहे. यामध्ये माझा संसार उद्ध्वस्त होणार आहे. याची दखल घ्यावी. असोसिएशनचे बेळगाव जिल्हाध्यक्ष के. बी. नवकुडकर म्हणाले, माजी सैनिक असल्यामुळे मदतीला धावू. बुडा अध्यक्ष फिरोज सेठ व ब्रिगेडियर कलवाड यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. यासंबंधीचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी व जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला यांना देण्यात आले आहे. यावेळी समाजसेवक संतोष दरेकर, प्रशांत राठोड, आप्पासाहेब पिंगळे आदी उपस्थित होते.