Thu, Jun 20, 2019 00:29होमपेज › Belgaon › प्रश्‍नपत्रिकाफुटीवर डिजिटलचा पर्याय

प्रश्‍नपत्रिकाफुटीवर डिजिटलचा पर्याय

Published On: Jun 29 2018 12:08AM | Last Updated: Jun 28 2018 11:29PMबेळगाव : प्रतिनिधी

अभियांत्रिकी परीक्षेच्या प्रश्‍नपत्रिका फुटू नयेत म्हणून विश्‍वेश्‍वरय्या तांत्रिक विद्यापीठाने यापुढे ‘डिजिटल’ व्यवस्थेचा पर्याय शोधला आहे. व्हीटीयूचे कुलगुरु डॉ. करिसिद्दप्पा यांनी याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, याआधी एका विषयाच्या लेखी स्वरूपातील 10 ते 16 प्रश्‍नपत्रिका तयार करण्यात येत होत्या. यापैकी एका प्रश्‍नपत्रिकेची निवड करण्यात येत होती. मात्र, या पद्धतीतून प्रश्‍नपत्रिका परीक्षेआधीच सोशल मीडियावरून व्हायरल होण्याचा प्रकार वाढला आहे. नुकत्याच झालेल्या अशा प्रकारात प्रश्‍नपत्रिका तयार करणार्‍या प्राध्यापकाचा हात असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे डिजिटल व्यवस्थेतून प्रश्‍नपत्रिकेची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे.

नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय रँकिंगमध्ये व्हीटीयूला 150 वे स्थान मिळाले आहे.  कर्नाटकात याबाबतीत विद्यापीठाचा सहावा क्रमांक लागतो. तांत्रिक शिक्षण दर्जा विकास कार्यक्रम अंतर्गत मान्यता मिळविणार्‍यांत व्हीटीयूचा समावेश आहे. यामुळेच विद्यापीठाला जागतिक बँकेकडून साडेसात कोटींचे आर्थिक सहाय मिळाल्याची माहिती डॉ. करिसिद्दप्पा यांनी दिली.

दरम्यान, कार्यकारी समितीच्या सदस्यांनी स्थापना दिनानिमित्त करण्यात येणार्‍या खर्चावर नियंत्रणाचा सल्‍ला दिला आहे. समारंभासाठी एक कोटीपेक्षा अधिक रक्‍कम खर्च केली जाणार आहे. मात्र, सदस्यांनी याबाबत नाराजी व्यक्‍त केली आहे. दरवेळी समितीच्या बैठकीत कार्यक्रमाकरिता सर्वानुमते निधी मंजूर करण्यात येत होता. यावेळी बैठक झाली नाही की सदस्यांची परवानगी घेतली नाही. विद्यापीठाची आर्थिक स्थिती मजबूत नाही. अशावेळी समारंभासाठी मोठा खर्च नको, अशी भूमिका सदस्यांची आहे. 

कोप्पळ जिल्ह्यातील तळकल येथे राष्ट्रीय कौशल्य विकास संस्था आणि पदव्युत्तर अभ्यास केंद्राच्या स्थापन्यासाठी कोनशिलासमारंभावेळी 11 कोटी रुपये खर्च करण्यात आले. हा पूर्णपणे सरकारप्रेरित कार्यक्रम होता. मात्र, मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्याची काय गरज होती असा प्रश्‍न सदस्यांचा आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून ‘मिनी प्रोजेक्ट’ची सक्‍ती करण्यात आली आहे. चौथ्या आणि पाचव्या सेमिस्टरमधील विद्यार्थ्यांना कॉलेज कॅम्पसमध्ये मिनी प्रोजेक्ट तयार करता येणार आहे.

विद्यापीठाचा आज स्थापना दिन

व्हीटीयूचा विसावा स्थापना दिन आज 29 रोजी साजरा होणार आहे.  ज्ञान संगमच्या आवारात कार्यक्रमाचे आहे. राज्यपाल वजुभाई वाला, मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, उच्च शिक्षणमंत्री जी. टी. देवेगौडा, केंद्रीय संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्‍लागार डॉ. व्ही. के. अत्रे कार्यक्रमात सहभागी होणार आहे.