Mon, May 20, 2019 10:05होमपेज › Belgaon › वाहनचालन सुलभ; कागदपत्रे मोबाईलमध्ये साठवण्याची मुभा

वाहनचालन सुलभ; कागदपत्रे मोबाईलमध्ये साठवण्याची मुभा

Published On: Feb 08 2018 1:43AM | Last Updated: Feb 07 2018 10:43PMबंगळूर ः प्रतिनिधी     

वाहन चालवणे आता अधिक सुलभ होणार आहे. कारण, वाहनांची कागदपत्रे वाहनात नसली तरी आता पोलिस कारवाई करू शकणार नाहीत. कारण, वाहन चालवण्यासाठी आवश्यक सारी कागदपत्रे डिजिलॉकर या अ‍ॅपमध्ये साठवून ठेवण्याची आणि ती पोलिसांना मोबाईलवर दाखवण्याची सोय आता उपलब्ध करून देण्यात आली आहे.

वाहतूक पोलिस किंवा प्रादेशिक वाहतूक अधिकार्‍यांनी (आरटीओ) यापुढे वाहनचाालकांकडे वाहन चालविण्याचा परवाना असो वा नोेंदणी पुस्तक अथवा प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची मागणी केल्यास डिजिलॉकरमध्ये स्टोअर झालेली सॉफ्ट कॉपी दाखविता येईल. वाहनधारकांकडील डिजिटल कॉपी ग्राह्य धरण्यात यावी, अशी सक्‍त सूचना राज्य परिवहन खात्याने  केली आहे.

यापूर्वी डीजीलॉकर मोबाईल अ‍ॅपमध्ये संग्रहित असलेल्या दाखल्यांची दखल पोलिस खात्याकडून घेतली जात नव्हती. मात्र वाहनधारकांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे डीजीलॉकर कॉपीला मान्यता देण्यास परिवहन खात्याने मान्यता देण्यास राजी झाले आहे.

यासंदर्भात परिवहन खात्याचे आयुक्त बी. दयानंद म्हणाले की, वाहतूक पोलिसांकडून वाहनांची तपासणी सुरू असताना वाहनधारकांना डीजीलॉकरमधील दाखले दाखविता येतील. ती सॉफ्ट कॉपी असल्याचे सांगून वाहतूक पोलिसांना नाकारता येणार नाही. विमा प्रमाणपत्रही डीजीलॉकरमध्ये साठवून ठेवण्याची योजनाही असून यासंदर्भात विमा कंपन्यांशी चर्चा करण्यात येत आहे.

काय आहे डीजीलॉकर अ‍ॅप?    

परवाना व प्रमाणपत्रे डिजीटल स्वरुपात संग्रह करून प्रमाणित करून घेणे, त्याचबरोबर वाहतूक पोलिसांना  दाखविण्याची व्यवस्था म्हणजे डीजी लॉकरअ‍ॅप. वाहनासंबंधीची सर्व कागदपत्रे नेहमी स्वत:जवळ ठेवून घेण्याची तसदी वाहनचालकांना घ्यावी लागणार नाही. आपल्याकडील मोबाईल हाच पर्याय ठरणार आहे.

नियंत्रण कक्ष स्थापन 

नागरिकांना परिवहन खात्याशी संबंधित  तक्रारी, सल्ला, सूचना वगैरे दाखल करण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष सोमवार ते शनिवारपर्यंत सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत सुरू राहणार आहे. वॉट्सअ‍ॅप, इ? मेल, ट्विटर, फेसबुक यासारख्या सोशल साईटवरुनही नागरिकांना सल्ला, सूचना मांडता येतील.

राज्य परिवहन खात्याने वाहनचालक आणि अन्य कागदपत्रांसंदर्भात केलेली सूचना वाहनधारकांना दिलासादायक आहे. नव्या सूचनेमुळे वाहनधारकांना नेहमी स्वत:जवळ बाळगावी लागणारी कागदपत्रे आता घरामध्ये सुरक्षित ठेवता येतील. मोबाईल डाटामध्ये असलेल्या माहिती आधारे वाहतूक पोलिस वाहनधारकांना मूळ कागदपत्रेे सादर करण्यासाठी ठराविक दिवसांची मुदत देतील. त्यानंतर कागदपत्रे सादर न केल्यास वाहनधारकांवर कारवाई होईल.या सुचनेसंदर्भात पुढील तांत्रिक बाबी पूर्ण होणे आवश्यक आहे. त्या पूर्ण झाल्यानंतर सुचनेची अंमलबजावणी होईल.
 एम. आय. मुप्पीनमठ, 
वाहतूक विभाग सहाय्यक पोलिस, बेळगाव.