Tue, Jul 16, 2019 01:37होमपेज › Belgaon › ऐन सणाच्या तोंडावर शहरात खोदाई सत्र

ऐन सणाच्या तोंडावर शहरात खोदाई सत्र

Published On: Mar 01 2018 1:44AM | Last Updated: Mar 01 2018 1:16AMबेळगाव : प्रतिनिधी
ऐन सणाच्या तोंडावर महापालिकेने शहरात खोदाई सत्र सुरु केले आहे. यामुळे शहरवासीयांतून नाराजीचा सूर उमटत आहे. दुरुस्तीसाठी खोदाई केल्यानंतर तातडीने दुरुस्ती करण्याची मागणीही केली जात आहे. 

शहराचा स्मार्टसिटी योजनेत निवड होऊन दोन वर्षांचा कालावधी उलटला तरीदेखील शहर अजूनही स्मार्ट होताना दिसत नाही. कोट्यवधी रुपये खर्च करून शहराच्या विकासाला चालना देण्यात आली आहे. शहरातील ड्रेनेजचीच समस्या निकालात काढली जात नसल्याने महापालिका करतेय काय, असा प्रश्‍नही शहरवासीयांतून उपस्थित केला जात आहे. शहराला अजूनही, रस्ते, ड्रेनेज, फुटपाथ, पथदीप आदी समस्यांनी ग्रासले आहे. 

शहरातील पांगुळ गल्ली, खडेबाजार, केळकरबाग, गणपत गल्ली, एसपी ऑफीस आदी ठिकाणी दुरुस्ती व केबलच्या कामास्तव खोदाई करण्यात आली आहे. पांगुळ गल्लीत गणपत गल्ली कॉर्नरवर ड्रेनेजलाईन दुरुस्तीसाठी खोदाई करण्यात आली आहे. अचानक ड्रेनेज येऊन खोदलेल्या खड्ड्यांत पाणी साचून दुर्गंधीयुक्त पाणी सर्वत्र पसरत आहे. 

खडेबाजार पोलिस स्थानकासमोर दुस्तीसाठी खोदाई करण्यात आल्याने रहिवासी व वाहनधारकांना त्रास होत आहे. तसेच एसपी ऑफिसशेजारीदेखील खोदाई करण्यात आली आहे. काकतीवेस रोडवर केबल घालण्यासाठी खोदाई केली आहे. केळकरबागेत मागील 3 ते 4 दिवसांपासून खोदाई केली असल्याने वाहनधारक व रहिवाशांना ये-जा करताना अडचणी येत आहे. याठिकाणी लहान मुलांची शाळा आहे. त्यांनादेखील त्रास सहन करावा लागत आहेत. यासाठी खड्डे खोदाईचे सत्र थांबवावे. किंवा लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे. गुरुवारपासून (दि.1)  होळीला सुरुवात होत आहे. शुक्रवारी  रंगपंचमी आहे. यानिमित्त खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत आहे. मात्र, ठिकठिकाणी खोदाई केल्याने अडचणी येत आहेत. सुमारे आठ दिवस हा सण असतो. यामुळे बाजारपेठेत नेहमीच गर्दी दिसून येते. यामुळे लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे. रंगपंचमीदिवशी पांगुळ गल्लीतील दरवर्षीप्रमाणे यावर्षीही लोटांगणाचा कार्यक्रम होणार आहे. मात्र, गल्लीच्या क्रॉसवरच खोदाई करण्यात आली असल्याने भाविकांनी अडचणी येणार आहेत.