Wed, Jul 17, 2019 20:30होमपेज › Belgaon › मतभेद गाडा, एकदिलाने लढा : शरद पवार

मतभेद गाडा, एकदिलाने लढा : शरद पवार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

सीमाभाग महाराष्ट्रात यावा यासाठी 62 वर्षांपासून लढा सुरू आहे. रस्त्यावरच्या लढाईबरोबरच हा लढा न्यायालयात नेण्यात आला असून, न्यायदेवतेकडून सीमाबांधवांना निश्‍चित न्याय मिळेल. आगामी निवडणुकीत अधिक उमेदवार निवडून आणल्यास लोकेच्छेचा तो महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे. यासाठी मतभेद गाडून टाका आणि एकदिलाने लढा, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार यांनी आज शनिवारी सीमावासीयांना केले.

मध्यवर्ती म. ए. समितीने सीपीएड मैदानावर आयोजिलेल्या सभेत पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे माजी मंत्री प्रा. एन. डी. पाटील होते.

शिवप्रतिमा आणि हुतात्म्यांच्या प्रतिमेचे पूजन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर कोल्हापूरचे खा. धनंजय महाडिक, माजी मंत्री जयंत पाटील, माजी खा. निवेदिता माने, मध्यवर्ती म. ए. समिती अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष माजी आ. मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, आ. अरविंद पाटील आदी होते.

पवार म्हणाले, सीमाप्रश्‍न सुटावा, यासाठी सीमाभागातील तीन पिढ्यांनी त्याग केला आहे. अनेक तरुणांनी या प्रश्‍नाची तड लागावी यासाठी आपला उमेदीचा काळ तुरुंगात काढला. साराबंदीसारखा लढा येथील शेतकर्‍यांनी यशस्वी केला. या लढ्याची तुलना अन्य लढ्यांशी होऊ शकत नाही. 

देश स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांतरचना झाली. त्यानंतर 35 लाख मराठी बांधव कर्नाटकात डांबण्यात आले. त्यावेळेपासून हा भाग अस्वस्थ आहे. त्यांच्या मागे उभे राहण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे, असेही पवारांनी सांगितले.

भाषेचा अवमान नाही

आम्ही कोणत्याही भाषेचा, प्रांताचा अवमान करत नाही. सर्वांचा सन्मान करतो. मात्र, त्यांच्याकडूनही तशीच अपेक्षा आहे. दुसर्‍या भाषेचा त्यांनीही दुस्वास करू नये. महाराष्ट्रातील जनता तहानलेली असताना कोयनेतून कर्नाटकाला पाणी सोडण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकार घेते. कर्नाटकाची तहान भागविण्याचे काम आम्ही करतो. आम्ही कोणत्याही बाबतीत दुजाभाव करत नाही.
1946 साली म. ए. समितीची स्थापना झाली. सर्वांनी व्यासपीठ निर्माण करण्याचे काम त्यातून करण्यात आले. यामाध्यमातून आजही लढा देण्यात येत आहे. 

मतदान हे लोकेच्छा व्यक्त करण्याचे माध्यम आहे. राज्यकर्त्यांनी त्याचा आदर करणे आवश्यक आहे. खटला मजबुतीसाठी सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामध्ये लोकेच्छा महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे. यासाठी सर्वांनी एकदिलाने लढणे आवश्यक आहे, 

अशी सूचनाही पवारांनी केली.सीमाबांधवातर्फे पवार यांचा शाल, मानपत्र देवून कॉ. कृष्णा मेणसे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

सीमाप्रश्‍न सर्वोच्च न्यायालयात आहे. तेथे मराठी माणसांची बाजू आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वकील मांडत आहे. न्यायदेवता आम्हाला निश्‍चित न्याय देईल.आम्हाला शंका नाही. मात्र, सीमाबांधवांनी एकत्रितपणे लढणे आवश्यक आहे. आगामी काळातील लढा प्रा. एन. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एकजुटीने लढा असे आवाहन शरद पवार यांनी केले.


  •