Tue, Jul 23, 2019 01:57होमपेज › Belgaon › कणकुंबीत कालव्याचे काम बंद

कणकुंबीत कालव्याचे काम बंद

Published On: Jan 15 2018 1:41AM | Last Updated: Jan 14 2018 11:47PM

बुकमार्क करा
डिचोली :  प्रतिनिधी

कर्नाटक निरावरी निगमने कणकुंबीत गोव्याकडे येणारा म्हादईचा प्रवाह मातीचा भराव टाकून रोखला होता. या कर्नाटकी कृतीची  गोव्यातील पर्यावरणप्रेमींनी आणि राज्य सरकारने गंभीर दखल घेतली. अनधिकृतपणे कालव्याचे काम सुरू ठेवल्याचे पुरावे गोव्याने गोळा केल्याने गडबडलेल्या कर्नाटक निरावरी निगमने युद्धपातळीवर चालवलेले काम रविवारी पूर्णतः बंद ठेवले. मात्र कर्नाटकच्या पुढील कृतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांनी रविवारी सकाळी कणकुंबीतील कालव्याच्या ठिकाणी भेट दिली असता कर्नाटक निरावरी निगमने युद्धपातळीवर सुरू ठेवलेले काम पूर्णत: बंद ठेवल्याचे आढळून आले. तेथील निरावरी निगमच्या कार्यालयालाही कुलूप असल्याचे दिसून आल्याचे केरकर यांनी सांगितले. सदर ठिकाणी गोव्याकडे येणारा जलप्रवाह बंद करण्यात आल्याचे पुरावे सर्वप्रथम प्रा.राजेंद्र केरकर यांनी कणकुंबीला भेट देऊन उपलब्ध केले होते व या प्रश्‍नी जागृती केली होती. त्यानंतर याबाबत वृत्तपत्रात फोटोसह  बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर राज्य सरकारने कर्नाटकच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले.

तसेच काल, शनिवारी जलस्त्रोत मंत्री विनोद पालयेकर यांनी कणकुंबीला भेट देऊन कर्नाटकाच्या कृतीचा निषेध नोंदवून कर्नाटकला  तशा आशयाचे पत्रही पाठवले. कर्नाटकच्या अनधिकृत कृत्याचे पुरावे दि.15 रोजी होणार्‍या सुनावणीवेळी म्हादई जलतंटा लवादासमोर सादर करणार असल्याचे स्पष्ट केले होते. सर्वोच्च न्यायालयाने काम बंद ठेवण्याचा आदेश दिल्यानंतर  कर्नाटकने काम बंद ठेवण्याची हमी दिली होती. मात्र, न्यायालयीन आदेशाला न जुमानता काम चालूच ठेवले होते. शुक्रवारी गोव्याकडे येणारा जलप्रवाह मातीचा बांध घालून रोखल्यानंतर रविवारी अचानक काम बंद ठेवले असले तरी कर्नाटकवर भरवसा ठेवणे धोकादायक असून कधीही काम सुरु करण्याची शक्यता आहे, अशा प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केल्या जात आहेत.