Thu, Mar 21, 2019 11:26होमपेज › Belgaon › हुक्केरीतील डायलेसिस केंद्र ‘दिवास्वप्न’

हुक्केरीतील डायलेसिस केंद्र ‘दिवास्वप्न’

Published On: Jul 02 2018 1:42AM | Last Updated: Jul 02 2018 12:04AMहुक्केरी : वार्ताहर

शासनाकडून लोककल्याणकारी अनेक योजना राबविण्यात येत असल्या तरी नागरिकांना त्याचा सदुपयोग होत नाही. यापैकी एक योजना म्हणजे हुक्केरी सरकारी इस्पितळातील डायलेसीसी केंद्र. किडनी विकारग्रस्त रुग्णांसाठी या रुग्णालयातील डायलेसीस केंद्र एक दिवास्वप्न ठरले आहे. मागील शासन काळात आरोग्यमंत्री एस. रमेशकुमार यांनी या डायलेसीस केंद्राला मंजुरी दिली. याला एक वर्षाचा काळ लोटला तरी हे डायलेसीस केंद्र सुरू न झाल्याने किडनी विकारग्रस्त रुग्णांना आणि नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्यातील अधिकार्‍यांचे दुर्लक्ष आणि केंद्राचे कंत्राट घेतलेली संस्था बेपत्ता तसेच लोकप्रतिनिधींमध्ये इच्छाशक्तीचा अभाव आहे. यामुळे या केंद्रास सुरू होण्याचे भाग लाभले नाही. यासाठी बसविण्यात आली लाखो रुपये किमतीची आधुनिक यंत्रोपकरणे निरुपयोगी होऊन धूळखात पडून आहेत.
हुक्केरी रुग्णालयात डायलेसीस करून घेण्यासाठी रुग्णांची नोंदणी करूनही केंद्र सुरू न झाल्याने किडनी विकारग्रस्त रुग्णांना दुप्पट रक्कम खर्च करून खासगी इस्पितळात डायलेसीस करून घ्यावे लागत आहे.

हुक्केरी तालुक्यात 16 प्राथमिक आरोग्य केंद्रे, दोन समुदाय केंद्रे आहेत. पण किडनी विकारग्रस्तांसाठी अत्यावश्यक असलेले हुक्केरी इस्पितळातील केंद्र मात्र रखडले आहे.
डायलेसीसी केंद्रासाठी इस्पितळाच्या पहिल्या मजल्यावर डायलेसीस खोली देण्यात आली आहे. दोन डायलेसीस यंत्रे, 2 बेड, शुध्द पाण्याची व्यवस्थेसह आवश्यक इतर कामासाठी सुमारे रु. 25 लाख खर्च करण्यात आले आहेत. सुरू होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या किडनीग्रस्त रुग्णांना नाईलाजास्तव डायलेसीससाठी लांबच्या शहरात जावे लागत आहे. किडनीग्रस्त रुग्णांना वरचेवर बेळगाव, गोकाक आणि शेजारच्या महाराष्ट्रातील गडहिंग्लज, मिरज, कोल्हापूर, सांगली व इतर ठिकाणी डायलिसीससाठी जावे लागत आहे.
सरकारी इस्पितळात डायलीसीस यंत्र बसविण्यात आल्याने बर्‍याच किडची विकारग्रस्त रुग्णांना आनंद झाला आहे. लवकरात लवकर हे डायलेसीस केंद्र सुरू करून या भागातील रुग्णांना दिलासा देण्याची नितांत गरजेचे आहे. यादृष्टीने प्रशासन व लोकप्रतिनिधी प्रयत्न करतील का ?  केंद्रात काम करण्यासाठी तीन स्टाफ नर्स, एक डी दर्जाच्या कामगाराची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सुरू करण्यास विलंब झाल्याने या कामगारांना वेळेत काम नसल्याने रिकामे बसून रहावे लागत आहे. तसेच किडनी विकास तज्ज्ञ वैद्याचे नियोजन करणेही आवश्यक आहे.