Thu, Jul 18, 2019 16:47होमपेज › Belgaon › शिवरायांचा महिपाळगड टाकणार कात

शिवरायांचा महिपाळगड टाकणार कात

Published On: Feb 09 2018 1:59AM | Last Updated: Feb 08 2018 8:31PMबेळगाव : संदीप तारिहाळकर

कर्नाटक सीमेवर वसलेला आणि बेळगाव येथून 15 कि. मी.वरील ऐतिहासिक महिपाळगड (ता. चंदगड) आता कात टाकणार आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन व गडकोट  विकासाचे बॅ्रण्ड अ‍ॅम्बॅसीडर आणि रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष खा. छत्रपती संभाजी राचे यांच्या मार्गदर्शनाखाली महिपाळगडाच्या विकास आराखडा निर्मितीस वेग आला आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात छ. संभाजीराजे पाहणी करणार आहेत.

खा. संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली अ. भा. शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, विश्‍वास निंबाळकर, गटकोट अभ्यासक संतोष हसूरकर, नंदकुमार ढेरे, अशोक कदम, निवृत्ती गावडे, विजय गावडे, सुनील शिंदे, सुभाष देसाई यांच्या शिष्टमंडळाने पाहणी केली आहे.  

शिवरायांचा सर्वात लांबचा किल्ला म्हणून गडाकडे पाहिले जाते. प्राचीन काळात म्हैपत राजाच्या नावावरून महिपाळगड नाव पडल्याचे सांगितले जातेे. इतिहासात लष्करीदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या  गडावर आजही सैन्यदल सराव करत असते.

राज्य पर्यटन विकास खाते व केंद्र सरकार यांच्या पर्यटन विकास निधीतून निधी आणण्याचे नियोजन आहे. चंदगड तालुक्यातील कलानंदीगडला 2 कोटी रु. च्या निधीतून कामांचा प्रारंभ झाला आहे. याच धर्तीवर  उत्कृष्ट पर्यटनस्थळ म्हणून गडाचा विकास करण्यात येणार आहे. गडाच्या खालच्या बाजूला पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारित येणारे  प्राचीन वैद्यनाथ मंदिर आहे. समितीच्या माध्यमातूनही निधी मिळविण्यासाठी खा. संभाजीराजे प्रयत्नशील आहेत. 

गडावर दीपमाळ आहे. याच गडावर प्राचीन विहिरीला 80 ते 90 पायर्‍या आहेत. याचीही दुरुस्ती होणार आहे. निवासस्थान बांधण्यात येणार आहे. वैद्यनाथ मंदिर व गडाच्या दरम्यान स्वामींची गुहा आहे. गडाच्या उत्तरेला दोन धबधबे आहेत. येथे येणार्‍या पर्यटकांची दखल घेऊन सोयीसुविधा पुरविल्या जाणार आहेत. 

पूर्वी गडावर कागवाडकर (चिंचेवाडी) व बादशहाचे राज्य होते. मात्र शिवरायांनी महिपाळगड ताब्यात ठेवला होता. सामानगडावर लढाई झाली, त्यावेळी महिपाळ गडावर लढाई होईल, म्हणून काही गडकरी खेड्यात राहायला गेले. मात्र महिपाळगडावर लढाई झाली नाही. या गडावर काही मराठी- कन्नड चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. येथे सूर्योदय आणि सूर्यास्ताचे मनोहर दर्शन घडते.  महादेव, गणेश, शटवाई व अन्य 5 बुरुजांची दुरुस्ती करण्याचे नियोजन आहे. पूर्वी गाव कारभार ढोलगरवाडी आणि सुंडी ग्रामपंचायतीमधून व्हायचा. मात्र महिपाळगड स्वतंत्र कार्यरत आहे.