Thu, Apr 25, 2019 18:02होमपेज › Belgaon › निराश्रित, कैद्यांना प्रथमच मतदानाचा अधिकार

निराश्रित, कैद्यांना प्रथमच मतदानाचा अधिकार

Published On: Apr 30 2018 1:43AM | Last Updated: Apr 29 2018 9:07PMबेळगाव : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीत प्रथमच राज्यातील निराश्रित, भिकारी व कारागृहातील कैद्यांना मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार बहाल करावा, असा आदेश उच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिला आहे. यामुळे निवडणूक प्रशासनाने त्यांना  हक्क बजावण्यासाठी लागणारी यंत्रणा सज्ज ठेवली असून प्रक्रिया सुरू केली आहे. स्थानिक निवडणूक यंत्रणेशी संपर्क साधला असता अशी सूचना राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाल्याची माहिती दिली.

राज्यभरातील निराश्रित केंद्रे, भिकार्‍यांची पुनर्वसन केंद्रे व कारागृहे यांची यादी बनवून त्यामध्ये वास्तव्य करणार्‍या व मतदानापासून वंचित राहिलेल्यांची यादी तयार करण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यानुसार ही जबाबदारी बेळगाव पालिकेचे आयुक्त यांच्यावर सोपवली आहे.

राज्यातील मतदारांची संख्या 4 कोटी 95 लाखावर गेली आहे. 12 मे रोजी मतदानाचा कार्यकाल एक तासाने वाढवला आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी या हेतूने राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला. मतदान सकाळी 7 ते सायं. 7 पर्यंत राहणार आहे. यापूर्वी हा कार्यकाल सकाळी 7 ते सायंकाळी 5 होता. संवेदनशील भागात पोलिस व निमलष्करी पथके तैनात करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे प्रथमच  लष्करी जवानांची मदत घेण्यात येणार आहे.

कैद्यांना मतदानाचा अधिकार द्यावा की देऊ नये याविषयी कायद्यात उल्लेख नाही. मात्र ज्यांना शिक्षा झाली आहे त्यांना हा अधिकार नसल्याचे निवडणूक अधिकार्‍याने स्पष्ट केले आहे. ज्यांच्याकडे इपिक कार्ड आहे अशांना नवीन ओळखपत्र देण्याची सूचना निवडणूक आयोगाने केली आहे.

निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात असून राज्य निवडणूक आयोगाने 5 हजार 232 इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) पाठवल्या असून नुकत्याच त्या दाखल झाल्या. याची प्रात्यक्षिके सादर करण्याचे काम सुरू आहे. विविध मतदारसंघात निवडणूक कर्मचार्‍यांना त्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. व्होटिंग मशीनसोबतच 5 हजार 541 व्हीव्हीपॅटी युनिटस् दाखल झाल्या आहेत. जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात त्या बसवण्यात येतील. जिल्ह्यातील 4 हजार 414 बुथमध्ये त्या बसवण्याचे काम सुरू होणार आहे. 14 तालुक्यात ही यंत्रसामग्री पाठवून देण्याची प्रक्रिया सुरू आहे. यंत्रात बिघाड झाल्यास पर्यायी यंत्रे तयार ठेवण्यात आली आहेत. यासाठी विशेष मोबाईल पथक तयार आहे. निवडणूक यंत्रणेने मतदानासाठी नव्या पात्र उमेदवारांची यादी तयार केल्यानंतर जिल्ह्यातील मतदारांची एकूण संख्या 36 लाख 57 हजार 541 वर गेली आहे. त्यामध्ये 18 लाख 54 हजार 485 पुरुष मतदार असून 18 लाख 2790 महिला मतदार आहेत.  अन्य मतदारांची संख्या 288 आहे. 

यावेळी ज्या मतदारसंघात महिला मतदारांची संख्या अधिक आहे. तेथे केवळ महिला मतदारासाठी पिंक रंगाचे मतदान केंद्र उघडण्यात येणार आहे व तेथे पिंक रंगाच्या साड्या कपडे परिधान केलेल्या महिला कर्मचारी सेवेत असतील.

मद्याची चोरटी वाहतूक, 2720 जणांवर गुन्हा

निवडणूक काळात चोरट्या मद्याची वाहतूक रोखण्यासाठी ठिकठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. अबकारी कायद्याचा भंग केल्याप्रकरणी 700 मद्य विक्री केंद्राचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. राज्यात एकूण 10 हजार मद्य विक्री केंद्रे आहेत. आतापर्यंत अबकारी खात्याने 14 कोटी रु. किमतीची 3 लाख 12 हजार लिटर दारू जप्त केली आहे. अबकारी कायद्याचा भंग केलेल्या 2720 जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.