Mon, Apr 22, 2019 04:09होमपेज › Belgaon › स्वातंत्र्यापासून शेवटचा माणूस वंचित

स्वातंत्र्यापासून शेवटचा माणूस वंचित

Published On: Aug 15 2018 2:05AM | Last Updated: Aug 15 2018 1:07AMबेळगाव : प्रतिनिधी

देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी  अनेकांनी सर्वस्वाचा होम केला. त्याग केला. मात्र ज्या उद्देशाने झुंज देण्यात आली, तो अद्याप साध्य झालेला नाही. दलित, शोषित, वंचित या शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचला नसल्याची खंत स्वातंत्र्यसैनिकांनी व्यक्त केली. 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्याला 72 वर्षाचा प्रदीर्घ काळ उलटला. या काळात अनेक बदल घडले. विकास झाल्याचा दावा राज्यकत्यार्ंकडून करण्यात येत आहे. ‘इंडिया शायनिंग’चा नारा देण्यात येतो. मात्र, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लाठ्या-काठ्या झेलल्या, रक्त सांडले, झुंज दिली त्यांना अपेक्षित स्वातंत्र्य कोसो दूर असल्याची खंत व्यक्‍त करण्यात येत आहे.

स्वातंत्र्यामध्ये सामान्यांचा, बहुजनांचा, शोषितांचा सर्वांगीण विकास होणे अभिप्रेत होते. प्रत्येकाला अन्न, वस्त्र, रोटी याची पूर्तता होण्याची अपेक्षा होती. घामाला दाम आणि हाताला काम मिळण्याची स्वप्ने पाहण्यात येत होती. यातील अनेक स्वप्ने दिवास्वप्नेच ठरली आहेत. यामुळे याचसाठी केला होता का अट्टहास, असा विषादपूर्ण प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे.

लोकशाही शासन प्रणाली लोकहितासाठी राबविण्यात येत आहे. परंतु, यातून लोकांचे भले होत आहे का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. मूठभर नेत्यांच्या हातात सत्ता एकवटली आहे. त्यांच्याकडून ठराविक लोकांच्या हिताचे निर्णय घेण्यात येतात. ज्या उद्देशाने स्वातंत्र्य मिळविण्यात आले, तो प्रश्‍न बनून छळत आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रतिक्रिया बोलक्या ठराव्यात...

स्वातंत्र्याची वाटचाल शतकाकडे सुरू झाली आहे. या कालखंडात अपेक्षित बदल झालेले नाहीत. परिवर्तन घडून आले नाही. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लाठ्याकाठ्या खाल्ल्या. हालअपेष्टा भोगल्या. ते सत्तेच्या परिघापासून दूर आहेत. मात्र, स्वातंत्र्यासाठी ज्यांच्या शर्टची इस्त्रीदेखील मोडली नाही, असे राज्यकर्ते सत्तेत आले. यामुळे भारतीय जनतेने विचार करण्याची वेळ आली आहे. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी दहावीच्या परीक्षेसाठी घरातून मिळालेले पैसे खर्च करून महात्मा गांधी यांच्या आंदोलनात सहभाग घेण्यासाठी वर्धा येथे धाव घेतली. 1946 चा तो काळ होता. देशातील सर्वजण स्वातंत्र्याने प्रेरित होते. गांधींच्या आश्रमात दाखल झालो. तेथे स्वागत करण्यात आले. महात्मा गांधी यांनी प्रार्थनेच्या वेळी बोलावून घेतले. गांधी म्हणाले, स्वातंत्र्य आता फार दूर नाही. देशात तळागाळापर्यंत जागृती झाली आहे. यामुळे 800 कि. मी. अंतरावरून ही मुले आली आहेत, असे सांगून त्यांनी आशीर्वाद दिला. बेळगावात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या चळवळीत आलो. स्वातंत्र्यानंतर परिवर्तन अपेक्षित होते. दलित, आदिवासी, रामोशी, भिल्ल, कोळी, बहुजन समाजाच्या जीवनात बदल अपेक्षित होते.  यामुळे कष्टकरी, श्रमकरी जनतेला न्याय मिळावा यासाठी कम्युनिस्ट पक्षात भाग घेतला. कष्टकर्‍यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. सामान्यजनांच्या जीवनात स्वातंत्र्याची पहाट उगवली नाही. शोषिताना न्याय मिळाला पाहिजे. स्वातंत्र्य चळवळीत सहभाग नसणारे आज देशाचा कारभार हाकत आहेत. जनता त्यांना साथ देत आहे. यासाठी जनतेने अंतर्मुख होऊन विचार करावा.

- कॉ. कृष्णा मेणसे, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक

स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांनी त्याग केला. यातून स्वातंत्र्य मिळाले. परकीय देशाबाहेर गेले. समस्या मात्र कायम आहेत. ज्यासाठी लढा देण्यात आला त्यापैकी अनेक स्वप्ने अधुरी आहेत. स्वातंत्र्यानंतर देशातील जनतेला समान न्याय मिळण्याची अपेक्षा होती. दुर्बल घटक विकासाच्या मुख्य प्रवाहात येणे अपेक्षित होते. त्यांना पोटभर अन्न आणि हाताला काम मिळण्याची गरज होती. प्रत्येक घटकाला सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक सुविधा मिळण्याचे स्वप्न पाहण्यात आले. परंतु, यापैकी अनेक गोष्टी अस्तित्वात आलेल्या नाहीत. वंचितांना संधी मिळेनाशी झाली आहे. आता आव्हाने बदलली आहेत. शत्रू परकीय नाहीत तर स्वकियाशी झुंज द्यावी लागेल. यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न करावे लागतील. प्रत्येकांने आपले काम प्रामाणिकपणे केल्यास यातून देशसेवा घडेल. सुराज्याची पालखी युवकांनी स्वत:च्या खांद्यावर घेणे अत्यावश्यक आहे. आजचे युवक देशाचे भावी शिल्पकार ठरणार आहेत. ही जाणीव प्रत्येकांने आपल्या अंतकरणात ठेवावी. विधायक कार्याचा वसा घेऊन समाज आणि राष्ट्र उभारणीत आपले योगदान द्यावे. समाजप्रबोधन आणि सुधारणेसाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. प्रत्येकाने आपल्यापरीने सामाजिक उपक्रम राबवावेत. व्यसनाधीनतेला आळा घालावा. प्रत्येकाने किमान एक रोप लागवड करावी. पर्यावरणाचा समतोल राखावा. वाहतुकीचे नियम पाळावेत. शिस्तीतूनच देश घडत असतो. प्रत्येकामध्ये देशप्रेमाची धगधगती ज्वाला प्रज्वलित होणे अपेक्षित आहे. यातून देशाचा इतिहास घडतो, याची जाणीव ठेवावी.

- विठ्ठल याळगी, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक

परकीय सत्तेखालील देश स्वतंत्र करण्यासाठी आम्ही आंदोलने केली. अनेकांनी हौतात्म्य पत्करले. घरादारावर निखारा ठेवून स्वातंत्र्यलढ्यात झोकून दिले. यामुळे देश स्वतंत्र झाला. परंतु, ज्या उद्देशासाठी आम्ही लढलो, ती अनेक स्वप्ने साकार होणे बाकी आहेत. स्वराज्य मिळाले, मात्र त्याचे रूपांतर सुराज्यात झाले नाही. स्वातंत्र्यासाठी जनतेने उठाव केला. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली अहिंसा मार्गाने युद्ध छेडण्यात आले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारला. अन्य नेते मंडळीही झुंज देत होती. परंतु, सर्वांचे  एकमेव ध्येय स्वातंत्र्य मिळविणे होते. यामुळे भारावल्या अवस्थेत आम्ही झुंज दिली. स्वातंत्र्यानंतर खूप मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, त्यापैकी अनेक अपेक्षा प्रत्यक्षात आलेल्या नाहीत.  शेतकरी, कष्टकरी, कामगार, शोषित, वंचित, बहुजन हे विकासापासून वंचित आहेत. सर्वच क्षेत्रात विषमता आहे. अंधश्रद्धा वाढत आहेत. व्यसनाने समाज पोखरला जात आहे. भ्रष्टाचार, विषमता, वशिलेबाजी, घराणेशाहीची कीड लोकशाहीला पोखरत आहे. शेवटच्या माणसापर्यंत स्वातंत्र्य पोहोचलेच नाही. शिक्षणापासून खेड्यापाड्यातील नागरिक आजही वंचित आहेत. गोरगरिबांच्या मूलभूत गरजा भागविण्यात राज्यकर्ते कमी पडत आहेत. यामुळे श्रीमंत-गरीब अशी दरी रुंदावत आहे. यातून समाज विकासाच्या वाटेकडे जाण्याऐवजी मागे जात असल्याचे दिसून येत आहे.
    
- परशुरामभाऊ नंदिहळ्ळी, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, माजी आमदार