Thu, Aug 22, 2019 10:11होमपेज › Belgaon › अति केले, हसे झाले : राष्ट्रीय पक्षांशी लढणार की मराठी संपवणार?

बंडखोरीला मुळापासूनच ठेचा

Published On: May 21 2018 1:11AM | Last Updated: May 21 2018 12:19AMबेळगाव : प्रतिनिधी

अति केले, हसे झाले या म्हणीसारखी बंडखोरांची अवस्था झाली आहे. मराठी उमेदवारांना पाडणे, हे एकमेव उद्दिष्ट समोर ठेवून निवडणूक लढवलेल्या सार्‍या बंडखोर उमेदवारांना पराभव तर स्वीकारावा लागलाच, सार्‍यांचे डिपॉझिटही जप्त झाले. काही बंडखोरांना तर तीन अंकी मते मिळाली आहेत. या बंडखोरीला आता मुळापासूनच ठेचण्याची गरज असल्याचे मत सीमाभागातून व्यक्त होत आहे.

म. ए. समितीला बंडखोरीचा शाप 70च्या दशकापासूनच आहे. तत्कालीन आ. परशुरामभाऊ नंदिहळ्ळी यांनी समितीशी बंडखोरी करून उमेदवारी लढवली. पण जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली. त्याचे कारण म्हणजे जनता त्या काळी समितीशी एकनिष्ठ होती आणि राष्ट्रीय पक्षांना सीमाभागात सक्षम उमेदवार मिळणेही दुरापास्त होते. 

अशा काळात बंडखोरी झाली तरी ती झेलण्याची ताकद समितीत  होती आणि समितीने ती झेललीही. पण एका मतदारसंघात बंडखोरी होणे आणि म. ए. समितीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात चक्क आघाडी उघडणे, त्यांना पाडण्याचेच उद्दिष्ट ठेवून निवडणुका लढवणे यात फरक आहे. नेमके हेच काम बंडखोर आणि त्यांच्या म्होरक्याने केले आहे, अशी टीका सीमाभागातून होत आहे.

बेळगाव आणि खानापूर तालुका ही समितीची शक्तीस्थाने. त्यामुळे बेळगाव दक्षिण, उत्तर, ग्रामीण, खानापूर आणि यमकनमर्डी या पाच मतदारसंघांपैकी यमकनमर्डी वगळता उर्वरित चार मतदारसंघात समितीचे सक्षम उमेदवार उभे होते. 2013च्या निवडणुकीत तर चारीही मतदारसंघांमध्ये समितीने चांगली लढत दिली आणि बेळगाव दक्षिण व खानापूर हे दोन मतदारसंघ जिंकले, तर ग्रामीणची जागा केवळ तेराशे मतांनी गमवावी लागली. बेळगाव उत्तरमध्येही एकच उमेदवार असल्याने समितीला मिळालेली मते 27 हजारांच्या घरात होती. रेणू किल्लेकर त्यावेळी दुसर्‍या क्रमांकावर  होत्या.

बेकी केली तर एकही जागा हाती लागणार नाही, हे 2008 च्या निवडणुकीने दाखवून दिले होते. त्यावेळी बेळगाव ग्रामीण, खानापूरात अधिकृत आणि बंडखोर असे दोन्ही उमेदवार उभे होते. तर एकी केली तर काय होऊ शकते, हे 2013च्या निवडणुकीने सार्‍या मराठी नेत्यांना दाखवून दिले होते. एकीमुळेच समितीला दोन आमदार निवडून आणता आले. पण चुकांतून सुधारतील तर ते मराठी नेते कसले, असाच प्रश्न सीमावासीयांना पडावा, अशी स्थिती निर्माण झाली आहे. 2013 चे  झणझणीत यश समोर असतानाही यंदाच्या निवडणुकीत समितीचे बालेकिल्ले असलेल्या खानापूर, बेळगाव दक्षिण आणि ग्रामीण या तिन्ही मतदारंसघांत बंडखोरी झाली. तिची बिजे रोवली असंतुष्ट नेत्यांनी आणि खतपाणी घातले त्यांच्या म्होरक्याने, अशी टीका आता जाहीरपणे  होते आहे.

ज्या उमेदवारांची दोन हजार मतेही मिळवण्याची क्षमता नाही, ज्यांनी काळ्या दिनाच्या फेरीत सहभाग घेण्याचेही टाळले असल्या नेत्यांना उमेदवार म्हणून जनतेसमोर आणून मराठी मतांची चेष्टाच केली का, असा प्रश्न आता विचारला जात आहे. प्रचार मोहिमेच्या दरम्यानही बंडखोरांना जनतेने बर्‍याचशा भागात प्रचारापासून रोखून परत पाठवले. किमान तेव्हा तरी बंडखोरांना आणि त्यांच्या म्होरक्याला पुढच्या परिस्थितीची कल्पना येणे आवश्यक होते. पण वैयक्तिक हेवेदाव्यांची पट्टी डोळ्यांवर बांधल्यामळे अधिकृत उमेदवारांना विरोध करण्याचा एकमेव अजेंडा राबवला गेला.