Thu, Jun 27, 2019 00:09होमपेज › Belgaon › मतदारसंघातील वर्चस्वावर विजय अवलंबून

मतदारसंघातील वर्चस्वावर विजय अवलंबून

Published On: May 07 2018 2:01AM | Last Updated: May 07 2018 12:14AMबंगळूर : प्रतिनिधी

सुपारीवरील बंदी, पाणीपुरवठा योजना, स्थगित असलेले भद्रावती एपीएम, व्हीएसआयएल कारखाना, जमिनींवरील अतिक्रमण असे विविध मुद्दे निवडणुकीत आहेत. भाजपला केंद्राच्या योजना, काँग्रेसला राज्य सरकारी योजना तर निजदला कुमारस्वामी यांच्या नावाचा आधार मत याचनेसाठी घ्यावा लागत आहे.पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदावर विराजमान होण्याचे स्वप्न पाहून त्या दृष्टीने प्रचारकार्य हाती घेणारे भाजप प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा शिकारीपूरमधून रिंगणात आहेत. काँग्रेसचे गोणी मालतेश त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत. पाणीपुरवठ्यावर लक्ष केंद्रीत करणारे एच. टी. बळीगार निजद उमेदवार आहेत. मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून येडियुराप्पांचे पारडे येथे जड असल्याची चर्चा मतदारांमध्ये आहे. गत निवडणुकीत येडियुराप्पा केजेपीतून विजयी झाले होते. त्यांना वगळता जिल्ह्यात कोठेही भाजपला यश मिळाले नव्हते. यंदा जिल्ह्याची संपूर्ण जबाबदारी येडियुराप्पांवर आहे.

शिमोगा मतदारसंघात भाजपचे के. एस. ईश्‍वरप्पा आणि काँग्रेसचे के. बी. प्रसन्नकुमार यांच्यात थेट लढत आहे. सागर मतदारसंघातून काँग्रेसतर्फे कागोडू तिम्मप्पा रिंगणात आहेत. त्यांचे भाचे बेळूर गोपालकृष्ण यांना भाजपने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी काँग्रेसप्रवेश केला. यामुळे तिम्मप्पांचे बळ वाढले आहे. येडियुराप्पांच्या आशीर्वादाने तिकीट मिळालेले हरताळु हालप्पा तिम्मप्पांचे प्रतिस्पर्धी आहेत. 
सोरबमध्ये माजी मुख्यमंत्री बंगारप्पा यांच्या मुलांमध्ये लढाई होत आहे. मधु बंगारप्पा विद्यमान आमदार आहेत. तर गेल्या तीन निवडणुकीत निजदकडून लढून पराभूत झालेले कुमार बंगारप्पा यंदा भाजपचे उमेदवार आहेत. काँग्रेस उमेदवार राजू तल्‍लूर यांना अखेरच्या क्षणी उमेदवारी देण्यात आली. 

तिर्थहळ्ळीमध्ये भाजपचे अरगज्ञानेंद्र, काँग्रेस आमदार किम्मने रत्नाकर, निजदचे आर. एम. मंजुनाथ यांच्यात लढत आहे. वक्‍कलिग मते तिन्ही पक्षांमध्ये विभागली असून आता इडीग समाजाची मते मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भद्रावतीत काँग्रेसकडून बी. के. संगमेश आणि निजदकडून एम. आप्पाजीगौडा रिंगणात आहेत. भाजपतर्फे लिंगायत समाजो प्रवीण पाटील उमेदवार आहेत.शिमोगा ग्रामीणच्या विद्यमान आमदार शारदा पुर्‍यानायक, भाजपचे अशोक नायक, काँग्रेसचे डॉ. श्रीनिवास यांच्यात लढत आहे. येडियुराप्पांच्या वर्चस्वाचा भाजप उमेदवाराला फायदा होण्याची शक्यता आहे.