होमपेज › Belgaon › हवं तर गोळ्या घाला, पण कर्नाटकात सोडा!

हवं तर गोळ्या घाला, पण कर्नाटकात सोडा!

Last Updated: May 27 2020 11:36PM
कोगनोळी : पुढारी वृत्तसेवा

आम्ही कर्नाटकचे रहिवासी असून, आम्हाला कर्नाटकात प्रवेश द्या. आम्ही महाराष्ट्र शासनाकडून शिमोग्यापर्यंत जाण्याचा पास काढला आहे. लहान मुलांना तुम्ही ताटकळत का ठेवताय. हवं तर तुम्ही आम्हाला काठीने मारा, गोळ्या घाला, पण कर्नाटकात सोडा, असा आक्रोश बुधवारी सकाळी पुष्पा अक्की व तिच्या कुटुंबातील आठ सदस्यांनी कोगनोळी तपासणी नाक्यावर केला. पण पोलिस खात्याने शासनाच्या आदेशाचे पालन करत त्यांना तब्बल तीन तास रोखून धरून प्रवेश देण्यास नकार दर्शविला. 

बुधवारी सकाळी मुंबई येथून एका मेटॅडोर वाहनातून लहान मुलांसह सुमारे नऊ प्रवासी दूधगंगा नदीवरील तपासणी नाका पार करून कोगनोळी फाट्यावरील तपासणी नाक्यापर्यंत येऊन पोहोचले. त्यांच्याजवळ महाराष्ट्रापासून शिमोगापर्यंतचा पास उपलब्ध होता. पण कर्नाटक शासनाचा ई-पास नसल्यामुळे पोलिसांनी रोखून धरले. 

सीपीआय संतोष सत्यनायक, उपनिरीक्षक बी. एस. तळवार यांनी त्यांना परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगून ई-पास काढल्याशिवाय पर्याय नसल्याचा खुलासा केला. पण प्रवाशांची ऐकून घेण्याची मानसिकता नव्हती. आमचं गाव कर्नाटकात असून बोली भाषाही कन्नड असल्याचे ओरडून सांगत होते. कर्नाटकात चालत जाण्याची तरी परवानगी देण्याची मागणी करीत होते. दुपारपर्यंत प्रवाशांना रोखून धरून पुन्हा महाराष्ट्रामध्ये पाठवण्याचा निर्धार करण्यात आला.