धारवाड : वार्ताहर
हुबळी? धारवाड महानगरपालिकेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण बैठकीत महानगरपालिका विभाजनाच्या मागणीने जोर धरल्याने बैठकीत काही वेळ गोंधळ माजला.
बैठकीला सुरुवात होताच नगरसेवक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीपक चिंचोरे यांनी महानगरपालिका विभाजनाचा मुद्दा मांडला. ते म्हणाले की, महानगरपालिकेने केवळ हुबळी शहराच्या विकासाकडे लक्ष केंद्रित केले आहे. धारवाडकडे दुर्लक्ष होत आहे. निधर्मी जनता दलाचे नगरसेवक राजू अंबोरे यांनी नगसेवक चिंचोरे यांना समर्थन दर्शवत धारवाडसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापण्यात यावे, अशी मागणी केली.
चिंचोरे म्हणाले की, एखाद्या शहरातून करसंग्रह 6 कोटी रु.पेक्षा अधिक असल्यास व लोकसंख्या 4 लाखापर्यंत असल्यास कर्नाटक म्युन्सिपल कौन्सिल कायद्यानुसार नूतन स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन करता येते. धारवाड शहरातून कर संग्रह 7.8 कोटी होतोे. शहराची लोकसंख्या 5.5 लाखापर्यंत आहे.
नगरसेवक राजण्णा कोरवाई, पांडुरंग पाटील, दशरथ वारी यांनी धारवाडला स्वतंत्र महानगरपालिका स्थापन करण्याच्या मागणीला विरोध दर्शविला. धारवाड? हुबळी जोडशहराची स्मार्ट सिटी योजनेत निवड झाली आहे. धारवाडसाठी स्वतंत्र महानगरपालिकेची मागणी झाल्यास स्मार्ट सिटी योजना अंमलबजाणीवर परिणाम होणार आहे. महापौर सुधीर सराफ यांनी हा मुद्दा उचलून धरला. धारवाडसाठी स्वतंत्र महानगरपालिकेची मागणी हा विषय अतिशय संवेदनशील असून एका बैठकीत निर्णय घेता येणे शक्य नाही. लवकरच लोकप्रतिनिधी, विचारवंत यांची संयुक्त बैठक घेऊन ठोस निर्णय घेता येईल, असे ते म्हणाले. बैठकीला सर्व नगरसेवकांसह आयुक्त शकील अहमद उपस्थित होते.