Wed, May 22, 2019 20:19होमपेज › Belgaon › बेळगावसाठी ‘उडाण योजना’ लागू करा

बेळगावसाठी ‘उडाण योजना’ लागू करा

Published On: Aug 03 2018 1:33AM | Last Updated: Aug 03 2018 12:03AMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव विमानतळासाठी ‘उडाण योजना’ लागू करण्यात यावी, या मागणीचे निवेदन गुरुवारी भारतीय जनता पक्षाच्या विधी सेलच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांंना देण्यात आले. याची प्रत पंतपधान नरेंद मोदींना पाठवण्यात आली. शिष्टमंडळाचे नेतृत्व सेलचे राष्ट्रीय सदस्य अ‍ॅड. एम. बी. जिरली यांनी केले. 

याबाबत जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बेळगावचे विमानतळ राज्यातील सर्वात जुने आणि सर्वसोयीनी युक्‍त आहे. या विमानतळामुळे बेळगावसह बागलकोट, विजापूर, धारवाड जिल्ह्याचा काही भाग आणि  महाराष्ट्राच्या कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गोवाच्या पूर्वेकडील भागातील  प्रवाशांची सोय होत आहे. यापूर्वी या ठिकाणाहून बंगळूर, मुंबई, हैदराबादसह अनेक शहरांसाठी सेवा देण्यात येत होती. गेल्या काही दिवसापासून ‘उडाण योजना’ केवळ हुबळीसाठी लागू केल्याने येथील सर्व खासगी कंपन्यांनी आपला मोर्चा हुबळीकडे वळवला आहे. खासगी कंपन्यांंना अनुदान मिळत असल्यामुळे त्यांनी मोठ्या शहरासाठी आता हुबळीहून सेवा सुरु केली आहे. यामुळे बेळगावहून केवळ बंगळूरसाठी सेवा सुरु असून, यामुळे विमानतळ ओस पडले आहे. बेळगावचे विमानतळ पांढरा हत्ती पोसण्यासारखे झाले आहे.

विमानतळावर मोठ्या क्षमतेची प्रवाशांची विमाने उड्डाण  घेऊ शकतात. त्यामुळे या ठिकाणीही ‘उडाण योजना’ सुरु करावी, अशी मागणी करण्यात आली. ‘पुढारी’ने याबाबतचे वृत्त 28 जुलै रोजी प्रसिध्द केले होते.

बेळगाव औद्योेगिकदृष्ट्या राष्ट्रीय स्तरावर आघाडीवर आहे. शैक्षणिकदृष्ट्याही महत्त्वाचे आहे. तीन विद्यापीठ आहेत. देशातीलच काय पण परदेशातूनही या ठिकाणी विद्यार्थी येतात.  या ठिकाणी उडाण योजना लागू करुन देशभरासाठी मोठ्या क्षमतेची विमानसेवा सुरु करण्यात यावी, अशी  मागणी करण्यात आली आहे. 

यावेळी ए. जी. मुळवाडमठ,  देवेंद्र बस्तीवाडी, मुरघेंद्रगौडा पाटील, हणमंत कोंगली, प्रवीण अगसगी, आर. एस. मुतालिक, रमेश देशपांडे, धन्यकुमार पाटील, एम. एस. हिरेमठ आदी सुमारे शंभर वकील उपस्थित होते.