Thu, Apr 18, 2019 16:14होमपेज › Belgaon › सीईटी निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात

सीईटी निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात

Published On: May 24 2018 1:32AM | Last Updated: May 24 2018 1:22AMबेळगाव ः प्रतिनिधी

सीबीएसईच्या बारावीचा निकाल न लागल्याने कर्नाटकातील सीईटी जाहीर करण्यास विलंब होणार आहे. याआधी 25 मेपर्यंत सीईटी निकाल जाहीर करण्याची शक्यता होती. आता जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सीईटी निकाल लांबणीवर जाणार आहे.

कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाच्या (केईए) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील बारावीचा निकाल आणि आयसीएसईचा निकाल जाहीर झाला आहे. सीबीएसईच्या अधिकार्‍यांना बारावी निकाल वेळीच जाहीर करण्याचे कळविण्यात आले होते. पण, अजूनही तेथून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. तो निकाल आल्याशिवाय कर्नाटकातील सीईटी निकाल जाहीर करता येत नाही. आता निकाल जाहीर केला तर सीबीएसईसाठी पुन्हा एकदा वेगळे रँकिंग द्यावे लागेल. 

सीईटी वेळापत्रकानुसार 25 मे पर्यंत निकाल जाहीर करणे आवश्यक होते. पण, सीबीएसई बारावी निकाल 30 मेपर्यंत लागण्याची शक्यता असल्याने जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सीईटी निकाल जाहीर केला जाणार आहे. निकालास विलंब झाल्यास पर्यायाने व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशाकरिता जागा वाटपालाही विलंब होणार असून संपूर्ण प्रक्रिया ठरविलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करणे अशक्य आहे.

अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेशासाठी सीईटी दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा विचार करावा लागतो. बारावी निकालाच्या आधारे सीईटी रँकिंग जाहीर केले जाते. त्यावरून विद्यार्थ्यांचा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश निश्‍चित होतो. सीबीएसई विद्यार्थ्यांना वगळून सीईटी निकाल जाहीर केला तर कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाला दुप्पट काम लागेल. शिवाय जागा वाटपाची प्रक्रिया किचकट होईल.

दरम्यान, पुढील शैक्षणिक वर्षापासून इतर बोर्डांशी निकाल वेळेवर जाहीर करण्यासंबंधी करार करण्याची तयारी केईएच्या तत्कालीन कार्यकारी संचालक व्ही. रश्मी यांनी केली होती. त्याआधीच त्यांची बदली करण्यात आली. सरकारी नोंदीनुसार सीबीएसई, आयसीएसईतील बारावीचे सुमारे चार हजार विद्यार्थी दरवर्षी कर्नाटकातील सीईटी देतात.

असे दिले जाते रँकिंग

सीईटी निकाल जाहीर करताना कर्नाटकातील बारावी विद्यार्थ्यांच्या गुणांचा विचार करून रँकिंग दिले जाते. सीबीएसई किंवा आयसीएसईच्या बारावी विद्यार्थ्यांना केईएकडे आपले गुण नोंदवावे लागतात. त्यानंतर त्यांचे रँकिंग ठरते. सध्या सीबीएसईचा निकाल अजूनही नसल्याने सीईटी प्रक्रियेला विलंब होणार आहे.