Tue, Jul 23, 2019 06:14होमपेज › Belgaon › पावसाचे घटते प्रमाण चिंताजनक

पावसाचे घटते प्रमाण चिंताजनक

Published On: Jul 11 2018 1:36AM | Last Updated: Jul 10 2018 8:38PMनिपाणी : प्रतिनिधी

निपाणी भागातील सरासरी पावसाचे प्रमाण घटत चालल्याने शेतकरीवर्गातून चिंता व्यक्‍त होत आहे. गतवर्षी जून महिन्यात 111.8 मि. मी. इतका पाऊस झाला आहे.  गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा पाऊस कमी झाला असला तरी शिवारे फुलली असून मशाागींच्या कामांना वेग आला आहे. पण वर्षागणिक पावसाचे घटते प्रमाण चिंताजनक दिसत आहे.

वर्षागणिक पाऊसमान घटत चालल्याने पिके कशी घ्यावयची, याची चिंता शेतकर्‍यांना लागून राहिली आहे. जून, जुलै महिन्यात मान्सून चांगला झाला तर सोयाबीन हे नगदी पीक शेतकर्‍याला साधता येते. पाऊस कमी झाल्यास ऑगस्ट महिन्यात तंबाखू लावणी करण्याकडे शेतकर्‍यांचा कल वाढतो, असे चित्र अलिकडच्या काळात निपाणी भागात दिसून येत आहे.

पीक परिस्थिती चांगली

सध्या सोयाबीनची उगवण चांगली झाली असून माळ मुरड रानाला मोठ्या पावसाची गरज आहे. अधून-मधून पडणारा पाऊस पिकाला चांगला आहे. निपाणी भागातील शेतकर्‍यांनी सोयाबीन, भुईमूग, ताग, उडीद, मुगाची पेरणी केली आहे. पिकांची उगवण चांगली झाली आहे. मजुरांचा तुटवडा भासत असला तरी कोळपणीची कामे सुरू आहेत. तंबाखू तरू निर्मितीसाठी वाफ्याला लागणारे शेणखत गोळा करण्याचे काम शेतकरी करू लागला आहे. सोयाबीनवरील किड रोगाच्या नियंत्रणासाठी औषध फवारणी केली जात आहे.

जवाहर तलावात 32 फूट पाणी

निपाणी भागात पावसाचे प्रमाण घटल्याने निपाणी शहरास पिण्याचे पाणीपुरवठा करणार्‍या जवाहर तलावातील पाण्याची पातळी 32 फूट 3 इंच आहे.  वेदगंगा नदी दुथडी भरून वाहत असल्याने हे पाणी जॅकवेलद्वारे उपसा करण्यात येत आहे. जॅकवेलवरील 270 एच. पी. ची एक मोटार सध्या नादुरूस्त असल्याने दुसर्‍या मोटारीद्वारे नदीतील पाण्याचा  उपसा सुरू आहे.

निपाणी पालिका शहरवासियांना दोन दिवसाआड याप्रमाणे पाणीपुरवठा करत आहे. जवाहर तलावाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढले तर डोंगरमाथ्यावरून ओढ्याद्वारे येणार्‍या पाण्याने तलाव भरतो.  2016 साली 3 ऑगस्टला हा तलाव ओव्हरफ्लो होऊन वाहू लागला होता. यंदा जून महिन्यात सरासरी पाऊस कमी झाल्याने तलावातील पाण्याची पातळी खालावली आहे. पावसाळ्यात पुरेसा पाऊस न झाल्यास पाणीटंचाई भेडसावते. त्यामुळे निपाणी भागातील शेतकर्‍यांना शेतीसाठी तर निपाणी शहरासह ग्रामीण भागाला पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे. त्यामुळे सार्‍यांच्या नजरा  मोठ्या पावसाकडे लागून आहेत.