Fri, Apr 26, 2019 19:18होमपेज › Belgaon › बेळगाव तालुक्यात बटाटा लागवडीत घट

बेळगाव तालुक्यात बटाटा लागवडीत घट

Published On: Jun 23 2018 1:20AM | Last Updated: Jun 22 2018 10:43PMबेळगाव : प्रतिनिधी

खरीप हंगामात शेतकरी जालंधर बटाटा लागवड करत आहेत. मात्र गतवर्षीपेक्षा यंदा एपीएमसीत जालंधर बटाट्याची उचल कमी झाली आहे. यंदा सुमारे 200 गाड्यांची विक्री झाली आहे, अशी माहिती व्यापार्‍यांनी माहिती दिली.  तालुक्यात यंदा 800 हेक्टरमध्ये लागवड करण्यात आली आहे.

बेळगाव तालुक्यात शेतकरी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात बटाटा लागवड करतात. शेतकरी बियाणे आठ दिवस घरी ठेवतात. त्यानंतर त्याची लागवड केली जाते. पण, यंदा बियाणे कुजत आहे. एका पिशवीत 5 ते  10 किलोपर्यंत बियाणे कुजत आहे. तर काही शेतकर्‍यांचे पूर्ण बियाणे खराब झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना फटका बसत आहे. काही शेतकर्‍यांनी लागवड केली आहे. पण, बियाणे उगवेल की नाही, याची भीती निर्माण झाली आहे. काही शेतकर्‍यांनी बियाणे खरेदी केली आहेत. पण लागवड केली नाही. पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी चिंतेत आहेत. एपीएमसीत गतवर्षी अधिक प्रमाणात शेतकर्‍यांनी अडत व्यापार्‍यांकडून बियाणे खरेदी केले होते. मात्र  यंदा शेतकर्‍यांचा थंडा प्रतिसाद मिळत आहे. 

बेळगाव तालुक्यात सुमारे आठशे हेक्टरमध्ये लागवड केली आहे. मात्र अजूनही बटाटा लागवड शिल्लक आहे. बाजारात सुरूवातीला अधिक दराने शेतकर्‍यांनी बियाणे खरेदी केले होते. पण सध्या प्रति क्विंटल 1600 त 1700 रूपये बियाणे दर आहे. रब्बी हंगामात शेतकर्‍यांना बटाट्याला चांगला भाव मिळाला होता. त्यामुळे शेतकरी बटाटा मोठ्या प्रमाणात उचलतील, असा  अंदाज अडत व्यापार्‍यांनी बांधला होता. पण, प्रत्यक्षात शेतकर्‍यांनी उचल कमी केली आहे.

बेळगाव तालुक्यात कडोली, बंबरगा, होनगा, काकती, कंग्राळी, बेळगुंदी, सोनोली, बिजगर्णी, तारिहाळ, मारिहाळ, मुतगे, सांबरा, संतीबस्तवाड, किणये, कर्ले, जानेवाडी आदी भागात जालंधर बटाटा लागवड केली जाते.