Thu, Apr 25, 2019 05:24होमपेज › Belgaon › अपेक्षित दराअभावी तंबाखू उत्पादनात घट

अपेक्षित दराअभावी तंबाखू उत्पादनात घट

Published On: Jun 13 2018 1:32AM | Last Updated: Jun 12 2018 9:47PMअकोळ : महालिंग पाटील

अकोळसह परिसर तंबाखू उत्पादनासाठी प्रसिध्द आहे. परिसरातील तंबाखू दर्जेदार आणि उत्कृष्ट असतो. अकोळ परिसरातील तंबाखू खरेदीकडे व्यापार्‍यांचा अधिक कल असतो. या परिसरात तंबाखूला मिळणार्‍या दरावरून अन्यत्र दर कितपत मिळेल, हे ठरते. पण गेल्या दोन वर्षापासून तंबाखू उत्पादक शेतकर्‍याला दर कमी मिळत असल्याने यंदा पर्यायी पिकाकडे शेतकरी वळत असून तंबाखू उत्पादनात प्रचंड घट दिसून येत आहे.

यापूर्वी तंबाखूला सुमारे 150 रुपयांपेक्षा अधिक प्रतिकिलो दर मिळत होता. उत्तम दर्जाचा तंबाखू अकोळ परिसरात पिकतो. त्याला बाजारात मोठी मागणी आणि महत्त्वही आहे. पण सध्या तंबाखूला मिळणारा दर पाहता आर्थिकदृष्ट्या शेतकर्‍याला परवडणारे नसल्याने उत्पादक शेतकरी नाईलाजाने अन्य पिकाकडे वळत आहे. यंदा तर 70 ते 100 रुपये दरम्यान तंबाखूची विक्री झाल्याने शेतकर्‍याला नुकसान सोसावे लागले आहे.

सध्या रासायनिक खत व शेणखताचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अडीच हजार रुपये प्रती ट्रॉली असणारा शेणखताचा दर आता चार हजारापर्यंत गेला आहे. तंबाखू चाकीचे काम करणार्‍या मजुरीचे दरही वाढले आहेत. तंबाखू बोद वाहतूक, हमाली इत्यादींचे दरही वाढले आहेत. व्यापार्‍यांकडून तंबाखूला काडीमाती यापूर्वी 5 किलो धरण्यात येत होते. आता सात-आठ किलो आकारण्यात येत आहे. त्यामुळे एका बोदातील 25 टक्के रक्‍कम इतर खर्चाला जाते.

शासन तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालत असल्याने तंबाखू उत्पादनावरही परिणाम होत आहे. त्यामुळे शेतकरी पर्यायी पिकाकडे वळत असून आर्थिक उन्‍नतीसाठी ऊस पिकावर भर देत आहे. तंबाखू पीक घरी सुखरूप येईपर्यंत शेतकर्‍यांची घालमेल होते. 

जादा पाऊस तंबाखू पिकाला मारक ठरतो. शिवाय कमी पाणीही तंबाखूला चालत नाही. रोगराई नियंत्रणासाटी खटाटोप, वाढती मजुरी, औषध फवारणीवर होणारा खर्च सोसावा लागतो. अनेक संकटांचा सामना करत तंबाखूचे उत्पादन घेऊनही अपेक्षित दर मिळेनासा झाला आहे.