Fri, Apr 19, 2019 12:16होमपेज › Belgaon › फलक लावताय? सावधान; वीजतारेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

फलक लावताय? सावधान; वीजतारेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

Published On: Feb 01 2018 1:42AM | Last Updated: Jan 31 2018 11:33PMबेळगाव : प्रतिनिधी

राष्ट्रीय महामार्गावर गांधीनगरनजीक गेल्यावर्षी स्वीट मार्टचा फलक लावताना झालेल्या दुर्घटनेत तिघांचा बळी गेला होता. ती घटना अजून विस्मृतीत गेली नसताना मंगळवारी सायंकाळी हेमूकलानी चौकात हॉटेल इमारतीवरील फलक लावताना वीजतारेच्या धक्क्याने बसवराज श्रीशैल शिवणक्की (वय 29, रा. ऑटोनगर) याचा मृत्यू झाला. 

मंगळवारी सायंकाळी हेमूकलानी चौक येथील हॉटेलच्या इमारतीवर फलक लावण्यासाठी बसवराज चढला होता. फलक लावत असताना इमारती शेजारील विद्युतभारीत तारेला स्पर्श झाल्याने तीव्र विजेच्या धक्क्याने बसवराज इमारतीवरून कोसळून गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात येत असताना त्याचा मृत्यू झाला. 

दुर्दैवी बसवराज हा हॉटेलचा फलक बदलत असताना किंचितशा दुर्लक्षामुळे त्याला विजेचा जीवघेणा धक्का बसला. असाच प्रकार गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात घडला होता. राष्ट्रीय महामार्गावरील आझादनगरजवळच्या सर्व्हिसरोड असलेल्या कुंदा सेंटरचा फलक लावण्यात येत होता. या फलक उचलताना त्या फलकाचा स्पर्श अतिउच्च दबाच्या विद्युत वाहिनीला झाला. त्यावेळी झालेल्या दुर्घटनेत दोघेजण जागीच ठार झाले होते अन्य एकजण उपचारादरम्यान ठार झाला होता. 

याचप्रमाणे दोन वर्षांपूर्वी आरपीडी चौकात ब्युटीपार्लरचा फलक लावण्यासाठी खांबावर चढलेल्या युवकाला प्राण गमवावे लागले होते. चार वर्षांपूर्वी श्रीमूर्ती विसर्जन मिरवणुकीत विजेच्या धक्क्याने चौघांचा बळी गेला होता.