Sat, Apr 20, 2019 15:53होमपेज › Belgaon › महापौर यांच्या वॉर्डातही डेंग्यू

महापौर यांच्या वॉर्डातही डेंग्यू

Published On: Jul 13 2018 12:47AM | Last Updated: Jul 12 2018 11:18PMबेळगाव : प्रतिनिधी

वडगाव-खासबागमध्ये डेंग्यूची लागण झालेली असतानाच, आता महापौरांच्या वॉर्डातही डेंग्यू रुग्ण आढळून आले आहेत. यमनापुरातील मराठा कॉलनी आणि शास्त्रीनगरमध्ये हे रुग्ण आढळले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

महापौर बसाप्पा चिकलदिनी प्रभागात बुधवारी दोन डेंगूचे रुग्ण आढळले असून ते खासगी इस्पितळात उपचार घेत आहेत, अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर दै. ‘पुढारी’ला देण्यात आली. या रुग्णामुळे या प्रभागात भीतीचे वातावरण पसरले आहे. 

यमनापूरमधील मराठा कॉलनी व शास्त्रीनगर येथे दोन डेंगू रुग्ण आढळले असून ते बेळगावातील खासगी इस्पितळांत उपचार घेत आहेत. त्यामुळे या प्रभागातील नागरिकांनी नाराजी व्यक्‍त केली आहे. यमनापूरमधील मराठा कॉलनी, शास्त्रीनगर या भागांत घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे. गटारी तुंबून ठिकठिकाणी डबकी तयार झाली असून डांसाची पैदास वाढली आहे. या भागात फॉगिंगची गरज असून ती मागणी करूनदेखील मनपाकडून पूर्ण होत नाही. त्यामुळे या भागात नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. 

महापौर बसाप्पा चिकलदिनी यांच्या प्रभागात ही समस्या असल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. यापूर्वी वडगाव भागात डेंग्यू, चिकनगुनिया व मलेरियाने थैमान घातले होते. ती आटोक्यात आणण्यासाठी फॉगींगसह स्वच्छतेवर भर देण्यात आला. विविध समाजसेवा संघटना, डॉक्टर, नगरसेवक यांनी मोफत लस पुरवून या भागातील रुग्णांना दिलासा दिला होता.

अशाच प्रकारच्या रोगांची लागण महापौराच्या प्रभागात होण्याची शक्यता बळकावली आहे. त्यामुळे या प्रभागात फॉगींगची गरज असल्याचे मत स्थानिकांनी दै. पुढारीकडे नोंदविले. आता आपल्या प्रभागातील समस्या निकालात काढण्यासाठी कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहीले आहे.