होमपेज › Belgaon › दांडेलीत मराठ्यांचा ‘मूक हुंकार’

दांडेलीत मराठ्यांचा ‘मूक हुंकार’

Published On: Jan 30 2018 1:55AM | Last Updated: Jan 29 2018 11:07PMदांडेली : वार्ताहर

मराठा समाजाचा ‘प्रवर्ग 3 ब’ मधून ‘2 अ’ प्रवर्गात समावेश करावा, या प्रमुख मागणीसाठी दांडेलीत सोमवारी मराठ्यांचा मूक हुंकार गर्जला. मराठा समाजाने ‘एक मराठा, लाख मराठा’ मूक क्रांती मोर्चा काढला. यावेळी दांडेली, जोयडा आणि हल्याळ तालुक्यातील हजारो समाज बांधव सहभागी झाले होते. व्यासपीठावर पाच मुलींनी धडाकेबाज भाषण करून हल्याळचे तहसीलदार विद्याधर गुळगुळी यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. राजर्षी शाहू महाराज मराठा विकास मंडळाची स्थापना करावी, प्रत्येक तालुक्यात मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची स्थापना करून गरीब विद्यार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा, कर्नाटक राज्यातील कोणत्याही एका विद्यापीठास शिवाजी महाराज यांचे नाव द्यावे, शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी 19 फेब्रुवारी रोजी सरकारी सुट्टी जाहीर करावी आदी मागण्या मांडण्यात आल्या आहेत.

हायस्कूल विद्यार्थिनी तन्मयी राजेश जाधव म्हणाली, मराठा हा लढवय्या समाज आहे. उत्पादनाला योग्य दर मिळत नसल्याने अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत.  मराठा समाजाला विकासाची संधी मिळण्यासाठी या समाजाला 3 ब प्रवर्गामधून 2 अ प्रवर्गात समावेश करण्यात यावा. प्राथमिक शालेय विद्यार्थी कार्तिक संजय जाधव, पावणी अर्जुन गुरव, संजना तुरसकर यांचीही भाषणे झाली. मुख्यमंत्र्यांच्या नावे  लिहिलेले निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले.  मूक मोर्चामध्ये हल्याळ, अल्लूर, केसरोळी, सांब्रानी, भागवती, यडोगा, मंगळवाडा, तेरगाव भागातील मराठा समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते, तर जोयडा तालुक्यातील जोयडा, प्रधान, पनसोली, निरनोली, अवेडा, शिंगरगाव, जगलबेट, असू, रामनगर भागातील हजारो मराठा बांधवांनी सहभाग घेतला होता. मोर्चाच्या शेवटच्या रांगेत सत्तारूढ, विरोधी पक्षाची नेते मंडळी, ग्रा.पं., ता.पं., जिल्हा पंचायत, नगरसेवक, नगराध्यक्ष व विधान परिषद सदस्य एस. एल. घोटणेकर, मराठा समाजाचे जी. आर. पाटील व इतर उपस्थित होते.


मुस्लिम समाज, इतर हिंदू संघटनांचे सहकार्य

मराठा मूक क्रांती मोर्चा येत असल्याचे पाहून मुस्लिम समाज, अन्य हिंदू समाज व राजकीय पक्षांच्या वतीनेही मोर्चातील नागरिकांना पाणी, ताक व जिलेबीचे वाटप झाले. सरबताची व्यवस्था हिंदू संघटना व व्यापार्‍यांनी केली. तर जिलेबीचे वाटप मुस्लिम बांधवांनी केले. सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांना प्राधान्य देऊन त्यांची पूर्तता करावी, असा अभिप्राय इतर संघटनांनी व्यक्‍त केला.