Wed, Jan 23, 2019 08:33होमपेज › Belgaon › डॉक्टरच तपासणी बेडवर झोपी जातात तेव्हा

डॉक्टरच तपासणी बेडवर झोपी जातात तेव्हा

Published On: Jan 14 2018 1:51AM | Last Updated: Jan 13 2018 11:18PM

बुकमार्क करा
दांडेली : वार्ताहर 

रूग्णांची तपासणी करावयाच्या बेडवर स्वत: डॉक्टरच झोपी गेल्याने रूग्णांतून तीव्र नाराजी व्यक्‍त करून या संदर्भात मुख्य वैद्याधिकार्‍यांना फोन करून तक्रार करण्यात आल्याची घटना नुकताच जोयडा हॉस्पिटल येथे घडली. जोयडा येथे सर्व सोयींनीयुक्‍त हॉस्पिटल असून डॉक्टरांचीही नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे दररोज मोठ्या संख्येने रूग्ण दवाखान्यात येऊन उपचार घेतात. 10 रोजी दुपारी 12.30 वा. च्या सुमारास हॉस्पिटलमधील डॉ.रघुराम हे रूग्ण तपासणी टेबलवरच झोपून राहिले. यावेळी 60 हून अधिक रूग्ण पावती काढून तपासणीसाठी डॉक्टरांच्या तपासणीरूम बाहेर थांबले होते. 
एक तास झाला तरीही डॉक्टर झोपेतून न उठल्यामुळे संतप्‍त रूग्णांनी मुख्य वैद्याधिकार्‍यांना फोन करून डॉक्टर तपासणी कक्षात झोपल्याची तक्रार केली.

या तक्रारीची दखल घेऊन मुख्य वैद्याधिकार्‍यांनी डॉ.रघुराम यांना फोन केल्यानंतर ते जागे झाले आणि आपण आतच बसलो आहे. गोंधळ कशाला घालता असे म्हणत रूग्णांनाच जोरजोरात बोलू लागले. यावेळी संतप्‍त रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना चांगलेच सुनावले. डॉक्टर महाशय झोपेतून उठण्यास तयार नसल्याने दूरच्या खेड्यातून आलेल्या 40-50 रूग्णांनी डॉक्टरांची वाट न पाहता ‘एएनएम’ यांना सांगून गोळ्या घेऊन गेले.  या गंभीर समस्येकडे जिल्हा वैद्याधिकार्‍यांनी लक्ष देऊन असे प्रकार होऊ नयेत यासाठी योग्य खबरदारी घ्यावी, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहेे.