Thu, Jul 18, 2019 10:17होमपेज › Belgaon › शेतातील  वीजवाहिन्या ठरताहेत ‘यमदूत’

शेतातील  वीजवाहिन्या ठरताहेत ‘यमदूत’

Published On: Aug 30 2018 1:16AM | Last Updated: Aug 29 2018 8:39PMबेळगाव : प्रतिनिधी

शिवारात लोंबकळणार्‍या आणि खराब झालेल्या वीजवाहिन्या शेतकर्‍यांसाठी यमदूत ठरत आहेत. यातून शेतकर्‍यांचे जीव जात असून खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. विशेषत: पावसाळ्यात हा धोका अधिक प्रमाणात जाणवतो. यासाठी सतर्क राहण्याची गरज आहे.

अलारवाड शिवारात एका शेतकर्‍याला वीजवाहिनीचा स्पर्श झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आठवड्यापूर्वी घडली. तत्पूर्वी खानापूर तालुक्यातील हिरेअंग्रोळी येथील शेतकर्‍याचा वीजवाहिन्या स्पर्श होऊन मृत्यू झाला. त्यापूर्वी आणखी एका शेतकर्‍याचा मृत्यू झाला होता. यातून वीजवाहिन्या सापळा शेतकर्‍यांसाठी धोकादायक ठरत असल्याचे दिसून येत आहे.

बेळगाव जिल्ह्यात मोठ्या पाणीपुरवठा योजना नाहीत. विशेषत: बेळगाव, खानापूर, सौंदत्ती, गोकाक, रामदुर्ग, रायबाग आदी तालुक्यात ही समस्या प्रामुख्याने जाणवते. यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी विहिरी आणि कूपनलिकांचा सर्रास वापर केला जातो. यासाठी वीज मोटारी वापरण्यात येतात.

शिवारातील विजेच्या तारा अनेक भागात लोंबकळतात. पावसाळ्यात याचा धोका अधिक प्रमाणात जाणवतो. यापैकी अधिकांश वीजवाहिन्या या जीर्ण झालेल्या असतात. त्या पावसात तुटून पडतात. त्याची कल्पना शेतकर्‍यांना येत नाही. यामुळे अपघाती घटना घडतात. त्याचबरोबर पावसाळ्यात उंदरांचा त्रास अधिक प्रमाणात असतात. त्यांच्याकडून वायर कुरतडण्यात येतात. कुरतडलेल्या वीजभारित तारांचा स्पर्श पाण्याला होताच वीजप्रवाह वाहतो. यातून विजेचा धक्‍का शेतकर्‍यांना बसतो. यामुळे हेस्कॉमसह शेतकर्‍यांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.

पावसाळ्यात शेतकर्‍यांनी मोटार सुरू करताना खबरदारी घेणे आवश्यक आहे. पायात आणि हातात वीजप्रतिबंधक साधनांचा वापर करावा. शक्यतो कोरड्या हाताने मोटारी सुरू अथवा बंद कराव्यात. वायरची वेळोवेळी तपासणी करावी. यामुळे धोका टाळता येतो. उच्चदाबाच्या ताराखाली झाडे, पिके घेताना सावधानता बाळगावी.