Sat, Nov 17, 2018 23:34होमपेज › Belgaon › प्रोत्साहन धनापासून डेअरी कर्मचारी वंचित 

प्रोत्साहन धनापासून डेअरी कर्मचारी वंचित 

Published On: Sep 10 2018 1:15AM | Last Updated: Sep 09 2018 8:52PMबेळगाव : प्रतिनिधी

दूध उत्पादक सहकारी संघाच्या कर्मचार्‍यांना 20 पैसे प्रतिलिटर प्रोत्साहन देण्याची घोषणा राज्य सरकारने अर्थसंकल्प मांडताना केली होती. मात्र ती देण्याचा विसर झाल्याचे दिसून येत आहे

राज्य सरकारने 2015-16 पासून प्रोत्साहन धन देण्याची योजना सुरू केली. पहिले वर्षभर धन दिले. मात्र त्यानंतर बंद केले आहे. गेली दोन वर्षेे प्रोत्साहन दिलेलेच नाही. थकित प्रोत्साहन देण्याची मागणी अनेकदा  करूनही सरकारने दखल घेतली नसल्याची दूध उत्पादक संघटनांची तक्रार आहे. मागील सरकारने सुरू केलेल्या सर्व योजना युती सरकारकडून पुढे चालविण्यात येतील, असे कुमारस्वामी नेतृत्वाखालील सरकारने दिलेले आश्वासन फोल ठरले आहे.

राज्यामध्ये 14 हजाराहून अधिक  दूध उत्पादक संघ असून 41 हजाराहून अधिक कर्मचारी आहेत. कर्मचारी ऊन, पाऊस, थंडी अशा कोणत्याही परिस्थितीत सकाळ ? संध्याकाळ या दोन्ही वेळेत 80 लाख लिटर दूध कॅनमध्ये भरून ट्रकमधून गावागावाना पाठवित असतात. कॅन रोजच्या रोज धुणे, दुधाचा दररोजचा हिशेब लिहून आठवड्यातून दूध संघाला सादर करणे, अशी कामे कर्मचार्‍यांना करावी लागतात.

बी. एस. येडियुराप्पा मुख्यमंत्री असताना दूध उत्पादकांना प्रतिलिटरला 2 रु. प्रोत्साहन धन देण्याची घोषणा करण्यात आली होती. दर 3 रु.नी वाढविल्यास यापैकी 2.50 रु. हे थेट दूध उत्पादकांना देणे, डेअरी देखभालीसाठी 30 पैसे व डेअरी कर्मचार्‍यांना 20 पैसे देण्याची स्पष्ट सूचना तत्कालीन सरकारकडून करण्यात आली होती. त्यामुळे कर्मचार्‍यांना थोडे अनुकूल झाले होते.

निवृत्तीबाबत मार्गसूची 

प्रोत्साहन धन देण्याची मागणी सरकारकडे करण्यास गेल्यानंतर निवृत्तीचे वय 60 असल्याचे सांगून दूध उत्पादक संघाच्या कर्मचार्‍यांची बोळवण केली. एकूणच  कर्मचार्‍यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार सरकारकडून झाला आहे. दूध उत्पादक संघाना कोणत्याही सुविधा न देता सरकारने आता निवृत्तीचे वय सांगून मार्गसूची जारी केली असल्याने कर्मचार्‍यांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.