Thu, Jul 18, 2019 00:47होमपेज › Belgaon › आम्ही प्राण्यांसारखे राहावे का?

आम्ही प्राण्यांसारखे राहावे का?

Published On: Feb 08 2018 1:43AM | Last Updated: Feb 07 2018 10:38PMचंदगड ः नारायण गडकरी 

कलानंदीगडाच्या पायथ्याशी असलेल्या कलिवडे धनगरवाडा वसाहतीवर देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाली, तरी अद्यापही सोयीसुविधा पोहोचल्या नाहीत.  आम्ही जंगलात राहतो, म्हणजे आम्ही वन्यप्राण्यांसारखे राहावे का? असा संतप्‍त सवाल धनगर समाज बांधवांनी केला आहे.  

कलिवडे धनगर वसाहत शासनाच्या 16 एकर 22 आर. पडीक जागेत वसली आहे. या वसाहतीमध्ये जायला रस्ता नाही. रस्त्यासाठी गेल्यावर्षी आंदोलन करावे लागले. मात्र, मिळालेल्या रस्त्यावर बांधकाम विभागाने खडीकरण व डांबरीकरण केलेले नाही. शिक्षणाची सुविधा आहे. मात्र, दोन खोल्या वगळता वाढीव इमारत अद्यापही मंजूर झालेली नाही. तसेच वाढीव शिक्षकही मिळालेले नाहीत. शाळेला क्रीडांगण नाही. पिण्याचे मुबलक पाणी मिळत नसल्याने महिलांना पाण्यासाठी जंगलात भटकावे लागते. लाखो रुपये खर्च करून ग्रामपंचायतीतून नळ पाणीपुरवठा सुरू केला  आहे. असलेली पाईपलाईन कधी फुटते, तर कधी जलकुंभात पाणीच नसते. स्मशानभूमी नसल्याने वन विभागाच्या हद्दीत अंत्यसंस्कार करावे लागतात. अंगणवाडी मंजुरीच्या प्रास्तावाचीही हीच अवस्था झाली आहे. वसाहतअंतर्गत रस्ते व गटरे नाहीत. कलिवड गावात मात्र सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. मात्र, धनगरवाड्यावर शासन हात आखडते का घेते, असा प्रश्‍न उपस्थित केला जातो.  

मुक्‍त घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध होत नाहीत. घरकूल योजना मिळत नाही. शौचालय योजनेचा पत्ताच नाही. सर्वांसाठी मोफत घेरे, सर्वांसाठी अनुदानासाठी शौचालय बांधण्याची योजना आणि सर्वांसाठी घरकूल उभारण्याकरिता गावठाणातील मोफत जागा शासन दरबारी कागदावरच आहे. अशा अनेक समस्यांच्या गर्तेत धनगर बांधव आपल्या संसाराचा गाडा हाकत आहेत.