Thu, Jul 18, 2019 10:52होमपेज › Belgaon › दोन यांत्रेकरूंच्यावर काळाचा घाला

दोन यांत्रेकरूंच्यावर काळाचा घाला

Published On: Jan 26 2018 1:22AM | Last Updated: Jan 25 2018 10:36PMबेळगाव : प्रतिनिधी

शालू खरेदीसाठी निघालेल्या वडगाव येथील महिलेचा बुधवारी सायंकाळी अपघाती मृत्यू झाल्याची दुर्घटना ताजी असताना गौंडवाडमध्ये गुरुवारी यात्रेला जाण्यासाठी पहाटे लवकर उठून तयारी करणार्‍या सुगंधा दुर्गाप्पा पंगण्णावर (वय 25) या विवाहितेचा गॅस सिलिंडर स्फोटात मृत्यू झाला.  

चिक्‍कलदीनी गावच्या जत्रेला जाण्यासाठी सुगंधा आणी दुर्गाप्पा गुरुवारी पहाटे लवकर उठले होते. दुर्गाप्पा पाणी आणण्यासाठी बाहेर गेला, तर सुगंधा स्वयंपाक घरात गेली. पण, सिलिंडरला गळती लागल्याचे सुगंधाला जाणवलेच नाही. त्यामुळे तिने गॅसशेगडी पेटवण्याचा प्रयत्न करताच सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात सुगंधा जागीच ठार झाली. पाणी आणण्यासाठी घराबाहेर गेलेल्या दुर्गाप्पालाही स्फोटाचा आवाज आला. पण, तो आवाज त्याच्याच घरातला असल्याचा त्यालाही थांगपत्ता नव्हता. तो घरी परतल्यानंतर सारा प्रकार उघडकीस आला. 

होनग्याहून परतताना मुतग्याचा युवक ठार

बेळगाव : प्रतिनिधी

मित्राच्या निमंत्रणावरून होनगा गावच्या यात्रेला गेलेल्या युवकाचा मुतग्याचा राजेश कृष्णा पाटील (वय 21, रा मुतगा) याचा घरी परतताना दुचाकी अपघातात मृत्यू झाला. बुधवारी रात्री उशिरा ही दुर्घटना बसवण कुडची गावाजवळ बेळगाव-बागलकोट महामार्गावर घडली.

बेळगाव-बागलकोट मार्गावर समोरून येणार्‍या टेम्पोने राजेशच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात राजेश गंभीर जखमी झाला. त्याला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा काही वेळातच मृत्यू झाला.

उल्लेखनीय म्हणजे ज्या टेम्पोने राजेशच्या दुचाकीला धडक दिली, तो टेम्पोही रेणुका भक्‍तांना घेऊन यल्लम्माला गेला होता. ते भक्‍तही दर्शन आटोपून परतत होते.