Thu, Apr 25, 2019 17:33होमपेज › Belgaon › चालू कृषी कर्जही माफ

चालू कृषी कर्जही माफ

Published On: Jul 13 2018 12:47AM | Last Updated: Jul 12 2018 11:24PMबंगळूर : प्रतिनिधी

शेतकर्‍यांची दोन लाखांपर्यंतची थकीत कर्जे माफ करण्याचा निर्णय घेतलेल्या कर्नाटक सरकारने आता ही सवलत चालू कृषी कर्जालाही दिली आहे. त्यानुसार एक लाखापर्यंतचे चालू खाती (थकीत नसलेले) कृषी कर्जही माफ होईल. मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी ही घोषणा गुरुवारी विधानसभेत केली.

चालू खाती कृषी कर्जमाफीमुळे सरकारी तिजोरीवर 10,700 कोटींचा अतिरिक्‍त भार पडणार आहे. मात्र, या घोषणेमुळे सर्वाधिक लाभ बेळगाव विभागाला होणार आहे. दरम्यान, विणकर, महिला बचतगटांना कर्जमाफी, उत्तर कर्नाटकावरील अन्यायावर योग्य उत्तर न मिळाल्याने भाजप आमदारांनी विरोधी पक्षनेते  येडियुराप्पा यांच्या नेतृत्वाखाली सभात्याग केला. काही भाजप आणि काँग्रेस नेत्यांनी कुमारस्वामींवर टीका केली होती. त्याला कुमारस्वामींनी उत्तर दिले.

बेळगाव विभागातील 9,501 कोटींची कर्जमाफी होणार आहे. यापैकी कॅनरा बँक 3,112 कोटी, सिंडिकेट बँक 2,446 कोटी, कॉर्पोरेशन बँक 1,180 कोटी,  विजया बँक 750 कोटी यासह विविध बँकांतून शेतकर्‍यांनी कर्जे घेतली आहेत. गुलबर्गा विभाग 5,563 कोटी, बंगळूर 7,454 कोटी, म्हैसूर विभागातील 6,760 कोटींची कर्जे माफ होणार आहेत.

इंधन दरवाढ, वीज दरवाढ मागे घेण्याचा कोणताच प्रस्ताव सरकारपुढे मुख्यमंत्र्यांनी त्यांनी स्पष्ट केले. कृषी कर्ज माफ करण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवरील उपकर 2 टक्क्यांनी वाढवून 32 टक्के केलेला आहे. त्यामुळे इंधन एक ते दीड रुपयांनी महागणार आहे. तर वीजही 20 पैसे प्रतियुनिट महागणार आहे. ही वाढ मागे घेण्याची काँग्रेसने केलेली मागणी मुख्यमंत्र्यांनी फेटाळली.

कळसा-भांडुरा

कळसा-भांडुरा प्रकल्पासंबंधी एच. के. पाटील यांनी पत्र पाठविले होते. ऑगस्ट महिन्यात लवादाकडून निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तत्काळ कामाला सुरुवात करण्यात येईल, असे कुमारस्वामींनी सांगितले.

तांदूळ 7 किलो

अन्नभाग्य योजनेंतर्गत अन्नधान्य वितरणात कपात करण्याची घोषणा करण्यात आली होती. ती मागे घेण्यात येत आहे. आता बीपीएल कार्डधारकांना प्रतिमाणसी 7 किलो तांदूळ मिळेल. आठवड्यापूर्वी प्रतिमाणसी 5 किलो तांदूळ देण्याचा निर्णय झाला होता.