Thu, Jul 18, 2019 10:08होमपेज › Belgaon › देवदर्शनाहून परतणार्‍या भक्‍तांवर घाला

देवदर्शनाहून परतणार्‍या भक्‍तांवर घाला

Published On: May 30 2018 2:15AM | Last Updated: May 30 2018 12:50AMबेळगाव : प्रतिनिधी  

काकतीजवळ पहाटे सहाच्या सुमारास क्रूझर वाहनाने थांबलेल्या ट्रकला धडक दिली. त्याबरोबर पार्थ संजीव चव्हाण (वय 9, रा. मतुलमार, ता. हल्याळ) याचा जागीच मृत्यू झाला. खानापूर तालुक्यातील कुसमळी गावातील चव्हाण कुटुंबीय व हल्ल्याळ तालुक्यातील मतुलमार येथील भेकणे कुटुंबीय देवदर्शनासाठी गेले होेते. शिर्डी, शनिशिंगणापूर, पंढरपूर आदी तीर्थस्थळांना भेटी देऊन ते मंगळवारी पहाटे बेळगावमार्गे खानापूरकडे जात होते. 

कमलाक्षी रवींद्र भेकणे (वय 18, रा. कुसमळी), रोहित संजय चव्हाण (12, रा. कुसमळी), भारती संजय चव्हाण (32, रा. मुतलमार, ता. हल्याळ), रवींद्र बसवाणी भेेकणे (58, रा. कुसमळी), वैशाली सुनील चव्हाण (23, रा. मुतलमार), यल्‍लाप्पा शिवाजी पाटील (28 रा. हिंडलगी-बिडी), मोहन नागाप्पा भातकांडे (38 रा.हिंडलगी), मंजुनाथ शंकर चव्हाण (40 रा. मुतलमा ), बेबीनंदा रविंद्र भेकणे (42 रा.कुसमळी), विनायक रविंद्र भेकणे (12 रा. कुसमळी) विशाल मंजुनाथ चव्हाण  (14 ) हरिप्रसाद मंजुनाथ चव्हाण (11 रा. मुतलमर ) पद्मावती मंजुनाथ चव्हाण (40 रा. मुतलमर) अशी जखमींची नावे आहेत. काही जखमींना खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळी काकती पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. मात्र पोलिसांनी तत्काळ अडथळा बाजूला करून मार्ग मोकळा केला.

नेहमीचाच धोका

बेळगाव-कोल्हापूर महामार्ग चौपदरी असला तरी काकतीत हा महामार्ग दुपदरीच होतो. कारण काकतीनजीक महामार्गावरच रात्रभर दुतर्फा ट्रक थांबलेल्या असतात. त्यामुळे दोन्ही बाजुंचा प्रत्येक एक पदर ट्रकनी व्यापलेला असतो. हे ट्रक इतर प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहेत.  गेल्या 31 डिसेंबरला थांबलेल्या टँकरला दुचाकीने मागून धडक दिल्याने बेळगावच्या तीन युवकांना जीव गमवाला लागला होता.

करोशी येथील महिला ठार

बेळगाव, सातारा : प्रतिनिधी 

सातारा शहरानजीक बॉम्बे रेस्टॉरंट येथे मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने निघालेल्या क्रूझरने थांबलेल्या ट्रकला पाठीमागून धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात महिला ठार झाली आहे. 

चंदाबाई बाळकू डोंगरे (वय 60, राहणार करोशी, ता. चिक्‍कोडी, जि. बेळगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. आणखी चौघांवर सातारा सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुक्मिणी डोंगरे (45), मंजुळा डोंगरे (40), सूरज डोंगरे, नीता डोंगर (सर्व जण राहणार करोशी, ता. चिक्‍कोडी) अशी जखमींची नावे आहेत. क्रूझरमध्ये 9 पुरुष, 3 महिला आणि 7 मुले असे 19 जण होते. चालक संतोष डोंगरे (25) याच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. उर्वरितांना मात्र काही लागले नाही.

डोंगरे कुटुंबीय तीन दिवसांपूर्वी नाशिक, त्र्यंबकेश्‍वर, शिर्डी दर्शनासाठी गेले होते. मंगळवारी पहाटे परत येत असताना टायर फुटल्याने हा अपघात झाला. अपघाताच्या आवाजाने परिसरातील नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढून या घटनेची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान, अपघातग्रस्त सर्व क्रूझर गाडीमध्ये होते.