Sun, Jul 21, 2019 16:17
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › ‘मराठी’ सरशी, पोलिस तोंडघशी

‘मराठी’ सरशी, पोलिस तोंडघशी

Published On: Jul 19 2018 1:36AM | Last Updated: Jul 18 2018 11:55PMनिपाणी : प्रतिनिधी

सीमाप्रश्‍नी ठराव मांडून तो संमत केल्यामुळे पोटशूळ उठलेल्या कन्‍नड रक्षण वेदिकेचा निषेध केला म्हणून मराठी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणार्‍या कर्नाटकी पोलिस तोंडघशी पडले आहेत. सर्व मराठी कार्यकर्त्यांची न्यायालयाने बुधवारी निर्दोष मुक्‍तता केली. दहा वर्षांनंतर या खटल्याचा निकाल लागला असून, निर्दोष मुक्‍ततेमुळे निपाणीसह सीमाभागातून आनंद  व्यक्‍त होत आहे. तर पोलिसी कारवाईचा फोलपणा उघड झाल्याच्या प्रतिक्रिया मराठी नेत्यांनी व्यक्‍त केल्या आहेत.

निपाणी नगरपालिकेचे नवीन सभागृह अस्तित्वात आल्यानंतर    परंपरेनुसार पहिल्या सभेत महाराष्ट्रात जाण्याची भावना प्रकट करीत बेळगाव, निपाणी, खानापूर, कारवार, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडण्यात येतो. त्यानुसार 2008 मध्येही असा ठराव संमत झाला. 23 जून 2008 रोजी तत्कालीन नगराध्यक्षा शुभांगी जोशी, उपनगराध्यक्ष झाकीर कादरी यांच्या  उपस्थितीत हा ठराव मांडला होता. 

सीमाप्रश्नाचा ठराव संमत झाल्यामुळे पोटशूळ उठलेल्या कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी नगरपालिकेत मोडतोड करीत करत पालिका इमारतीवरचा भगवा झेंडा उतरविण्याचा प्रयत्न केला होता. तसेच शहरातही दंगल माजवण्याचा प्रयत्न केला होता. 

करवेच्या या कृतीचा त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. त्यामुळे निपाणी शहर पोलिसांनी नगराध्यक्षा शुभांगी जोशी, उपनगराध्यक्ष कादरी, नगरसेवक प्रविण भाटलेयांच्यासह बेळगांव जिल्हा शिवसेनाप्रमुख बाबासाहेब खांबे, महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष जयराम मिरजकर, सुभाष खाडे, संजय सांगावकर, संजय सांळुखे, बाळासो गायकवाड, केदार जाधव, उत्तम जाधव, राजू रेपे, सुहास चव्हाण, राजू कासोटे, प्रदीप नाईक, सुभाष चव्हाण, राजू कुमठेकर, महेश कुकडे, अतूल काळे, संदीप महाजन, हनुमंत भुरळे, शंकर इदली व दावा सुरू असताना निधन झालेले संजय बडवे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. बेकायदा जमाव जमवणे, भाषिक तेढ माजवणे असे गुन्हे दाखल होते. 

खटल्याची अंतिम सुनावणी येथील निपाणी न्यायालयाचे अतिरिक्‍त न्यायाधीश देवराज यांच्यासमोर होऊन सबळ पुराव्याअभावी सार्‍या मराठी कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्‍तता करण्यात आली. मराठी कार्यकर्त्यांच्या वतीने खटल्याचे काम अ‍ॅड. आर. बी. तावदारे, अ‍ॅड. पी. ए. तारळे, अ‍ॅड.  अश्पाक पाटील, अ‍ॅड.मारुती सनदी, अ‍ॅड.  एस. एस. मेक्‍कळकी, अ‍ॅड. संजीवनी कदम यांनी पाहिले. तब्बल दहा वर्षानंतर या खटल्याचा निकाल लागून निर्दोष मुक्तता झाल्याने खटल्याशी संबंधित सर्वांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, पोलिसांनी करवेच्या कार्यकर्त्यांवरही गुन्हे नोंदवले होते. त्यांचीही निर्दोष मुक्तता झाली आहे.