Mon, Mar 25, 2019 04:59
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › भूमिगत वीजवाहिन्या तुटल्याने कोटीचा फटका

भूमिगत वीजवाहिन्या तुटल्याने कोटीचा फटका

Published On: Jun 26 2018 1:14AM | Last Updated: Jun 25 2018 10:45PMबेळगाव : प्रतिनिधी

शहरात स्मार्टसिटी अंतर्गत काम सुरु आहे. भूमिगत वीजवाहिन्या घालण्याचे काम सुरु असून महापालिका, बीएसएनएल, सार्वजनिक बांधकाम खाते, पाणी पुरवठा खाते यांच्याकडून विविध कारणांनी रस्ता खोदाई केल्यानंतर आतापर्यंत भूमिगत वीजवाहिनी 27 वेळा तुटली आहे. त्यामुळे 1 कोटी 3 लाख 50  हजाराचा फटका हेस्कॉमला बसला आहे. जेसीपी व इतर यंत्राने रस्ता खोदाई करताना खबरदारी घेणे गरजेचे आहे.

शहरातील काही भागात व उपनगरात भूमिगत वीजवाहिन्या घालण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यावरच  वीजजोडणी करण्यात आली आहे. हेस्कॉमला कोणतीही कल्पना नसताना रस्ता खोदाईचे काम हाती घेतले जाते. अवघ्या तीन ते साडेतीन फुटावर भूमिगत वीजवाहिन्या घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्या रस्ता खोदाई करताना वारंवार तुटत आहेत. प्रत्येक वेळेला तुटलेल्या भूमिगत वीजवाहिन्या दुरुस्त करण्यासाठी 50 हजाराच्या घरात खर्च होत आहे. आतापर्यंत 27 वेळा भूमिगत वीजवाहिन्या विविध ठिकाणी खोदकाम केलेल्या कामात तुटल्या आहेत. त्यामुळे दुरूस्तीसाठी सुमारे 1 कोटी 3 लाख 50 हजार रू. खर्च झाला आहे. त्यामुळे रस्ता खोदाई करताना हेस्कॉमला पूर्वसूचना दिल्यास  भूमिगत वीजवाहिन्या तुटण्याच्या घटनांत घट होईल व संभाव्य दुर्घटनादेखील टाळता येतील. भूमिगत वीजवाहिन्या स्मार्टसिटी अंतर्गत महत्वाच्या भागाला जोडण्यात आली आहे.

जिल्हा रुग्णालय, पोलिस वसाहत, रामनगर, काळी आमराई, कॉलेज रोड, जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय परिसर  आदी भागात भूमिगत वीजवाहिनीद्वारे वीजप्रवाह सुरू आहे. त्यामुळे एकदा 11 केव्ही क्षमतेची वायर तुटली तर किमान तीन तास वीजप्रवाह खंडित होतो. त्यासाठी यापुढे तरी रस्ता खोदाई करताना हेस्कॉमला कल्पना द्यावी, असे आवाहन सहाय्यक कार्यकारी अभियंता अश्‍विन शिंदे यांनी केले आहे. शहर व उपनगरात भूमीगत वीजवाहिन्या घालण्यात आल्या आहेत. त्यासाठी महापालिका, बीएसएनएल, सार्वजनिक बांधकाम खाते, पाणी पुरवठा खाते यांच्याकडून विविध कारणांनी रस्ता खोदाई करण्यात येते. रस्ता खोदण्यापूर्वी पूर्वकल्पना दिल्यास हेस्कॉमला फटका बसणार नाही.

दुर्घटना घडण्याची शक्यता

भूमिगत वीजवाहिन्या 11 केव्ही क्षमतेच्या आहेत. एखाद्या वेळेला वीजवाहिनीचा स्पर्श जेसीबी अथवा इतर रस्ता खोदाई  करणार्‍या यंत्राला झाल्यास दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. वीजप्रवाह सुरु झाल्यास जीवितहानी होण्याची शक्यता आहे. यावेळी स्फोट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.