Sat, Jan 19, 2019 14:46होमपेज › Belgaon › कर्नाटकाकडून न्यायालयाचा अवमान

कर्नाटकाकडून न्यायालयाचा अवमान

Published On: Aug 04 2018 1:32AM | Last Updated: Aug 03 2018 11:00PMबेळगाव : प्रतिनिधी

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न सर्वोच्च न्यायालयात असताना बेळगावला द्वितीय राजधानीचा दर्जा देण्याची घोषणा करणारे कर्नाटकाचे मुख्यमंत्री एच. डी.कुमारस्वामी यांना न्यायालयीन अवमानाची नोटीस पाठविण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या ‘सामना’च्या अग्रलेखातून याबाबत जोरदार टीका करण्यात आली आहे.

बेळगावातील सुवर्णसौधसमोर मठाधीश आणि विविध संघटनांनी उत्तर कर्नाटक स्वतंत्र राज्यासाठी आंदोलन केले. आंदोलकांना आश्‍वासन देताना कुमारस्वामी यांनी बेळगावला दुसरी राजधानी बनवण्याचे आश्‍वासन दिले. 

सीमाप्रश्‍न न्यायप्रविष्ट असतानाही बेळगावात सुवर्णसौध निर्माण करण्यात आले. त्या ठिकाणी वर्षभरात एकदाच विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होते. कोणतेच शासकीय कार्यालय तेथे नाही. गेल्या सहा दशकांपासून बेळगावातील मराठी भाषिक कर्नाटकात डांबले गेले आहेत. कुमारस्वामी यांनी राजधानीबाबत विधान करून तेथील मराठी लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे. सीमाप्रश्‍नी निकाल लागलेला नसताना त्या भागाबाबत निर्णय घेता येत नाही. तसे असले तरी कुमारस्वामींनी घेतलेला निर्णय म्हणजे न्यायालयाचा अवमान आहे. महाराष्ट्र सरकारने याविषयी सतर्क व्हावे. याविरोधात महाराष्ट्राची बाजू मांडणार्‍या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास हा विषय आणून द्यावा. कर्नाटकाला नोटीस पाठवावी, असा आग्रह शिवसेनेने केला आहे.