Tue, Nov 20, 2018 06:24होमपेज › Belgaon › ‘थर्टी फर्स्ट’चे काऊंटडाऊन... 

‘थर्टी फर्स्ट’चे काऊंटडाऊन... 

Published On: Dec 26 2017 1:32AM | Last Updated: Dec 25 2017 11:45PM

बुकमार्क करा

बेळगाव :प्रतिनिधी 

सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी तरूणाई सज्ज झाली आहे. 31 डिसेंबरचे काऊंटडाऊन सुरु झाले असून नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अवघ्या 6 दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. यानिमित्ताने सोशल माध्यमांवर संदेशाची देवाणघेवाण सुरु झाली आहे. 

रविवारी मध्यरात्री 12 वाजता नव्या वर्षाचे स्वागत करण्यात येणार आहे. थर्टी फर्स्टच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस यंत्रणेने सजग राहण्याची गरज आहे. थर्टी फर्स्टच्या मध्यरात्री 12 वाजता संगीताच्या तालावर थिरकत फटाक्यांची आतषबाजी करत तरूणाई अखंड जल्लोष करते.   

31 डिसेंबरच्या पार्श्‍वभूमीवर हॉटेल, धाबे, हिलस्टेशन आदींकडे सर्वांचाच ओढा असतो. ही संधी कॅश करण्यासाठी हॉटेल व्यवसायिकही सज्ज झाले आहेत. नववर्षाचे स्वागत करताना प्रत्येकाने जबाबदारीचे भान राखणे गरजेचे आहे. आपल्या हातातून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दक्षता घेणे गरजेचे आहे.

प्रत्येकवर्षी सरत्या वर्षाला निरोप देताना नवीन वर्षात जुनेच संकल्प पुन्हा नव्याने केले जात आहेत. मात्र, असेही काही तरूण केलेला संकल्प पूर्ण करत आहेत. अनिष्ट रुढी आणि प्रथांचे प्रतिक ओल्डमॅन जाळून नव्या जोमाने नववर्षात पदार्पण करण्यासाठी अनेकजण सज्ज झाले आहेत. 

शहरी धांगडधिंगाण्यापासून दूर रम्य ठिकाणी जाऊन नववर्ष साजरा करण्याचा बेतही आखला जात आहे. मित्रकंपनी एकमेकाला नवीन वर्षात कोणता संकल्प केला किंवा करणार याची विचारणा करताना दिसत आहेत.  

पोलिसांनी सतर्क राहण्याची गरज

सध्या शहरात झालेल्या जातीय दंगलीमुळे वातावरण बिघडले आहे. अवघ्या दिड महिन्यात शहरात सहा वेळा जातीय दंगल झाली. 31 डिसेंबरच्यानिमित्ताने तरुणाईकडून हुल्लडबाजी  प्रकार घडून येतात.