Fri, Apr 19, 2019 07:57होमपेज › Belgaon › पोलिसांचे ठाण्यातच होणार समुपदेशन

पोलिसांचे ठाण्यातच होणार समुपदेशन

Published On: May 25 2018 1:08AM | Last Updated: May 24 2018 8:23PMबेळगाव : प्रतिनिधी

कर्तव्य बजावत असताना नेहमीच तणावाखाली असणार्‍या पोलिसांचे समुपदेशन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. अशा केंद्रात अनुभवी अधिकार्‍यांकडून समुपदेशन केले जाणार आहे. याबाबतची रूपरेषा बेळगाव उत्तर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक अलोककुमार तयार करत आहेत.नुकताच विधानसभा निवडणूक झाली. यासाठी संपूर्ण राज्यात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यातून बाहेर पडलेले पोलिस आता आपापल्या पदाची जबाबदारी सांभाळण्यासाठी ठाण्यात हजर होत आहेत. 

पोलिस खात्यामध्ये नेहमीच कामाचा ताण असतो. दररोज धावपळ करावी लागते. कोणत्याही वेळी गंभीर प्रसंग घडला की क्षणाचाही विलंब न लावता तत्काळ निर्णय घ्यावा लागतो. घटनास्थळी कमीतकमी वेळेत पोचावे लागते. अशा घटना अनेकदा घडतात. यामुळे पोलिसांवर काही प्रमाणात ताण पडतो. कामातील उत्साह निघून जातो. अशावेळी संबंधित व्यक्‍ती तणावाखाली वावरते, खिन्नता येते. अशा व्यक्‍तीला पाहिल्यानंतर ती आरोग्यपूर्ण दिसत असली तरी मानसिक आरोग्य दिसून शकत नाही. अशा परिस्थितीतून वाचण्यासाठी ठाण्यातच समुपदेशनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. यामुळे संभाव्य बिकट परिस्थितीवर मात करणे शक्य होणार आहे.

मानसिक आरोग्य जपणे आणि आत्मस्थैर्य निर्माणासाठी इंजेक्शन देऊन चालत नाही. आपली क्षमता वाढविण्यासाठी समुपदेशन केंद्रे महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. याआधी गुलबर्गा येथे अशा प्रकारचे समुपदेशन करण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांनी अधिकार्‍यांसमोर विविध समस्या मांडल्या होत्या. वरिष्ठ अधिकार्‍यांपर्यंत त्या पोचवून त्यावर उपाययोजना करण्यात आल्या होत्या.संभाषण कौशल्य चांगले असलेल्या अधिकार्‍याला समुपदेशन केंद्रात नियुक्‍त केले जाते. त्याबाबतचे प्रशिक्षण अधिकार्‍यांना दिले जाते. समुपदेशन करण्यात येणार्‍या व्यक्‍तीचे मित्र, नातेवाईंकांकडून माहिती मिळविली जाते. तणावातून बाहेर येण्यासाठी त्यांना उपाय सुचविले जातात. त्यानंतरही ती व्यक्‍ती तणावाखाली असेल तर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचाराचा सल्‍ला दिला जातो.