होमपेज › Belgaon › मनपाची सर्वच कामे निकृष्ट

मनपाची सर्वच कामे निकृष्ट

Published On: Jun 28 2018 1:32AM | Last Updated: Jun 27 2018 11:36PMबेळगाव : प्रतिनिधी  

शहरातील सर्वच विकासकामे निकृष्ट झाल्याचा गंभीर आरोप सत्ताधारी व विरोधी गटातील नगरसेवकांनी मनपाच्या सर्वसाधारण बैठकीमध्ये केला. गटारी, नाल्यांचे बांधकाम असो वा इतर सर्वच कामे सुमार दर्जाची झाल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. यावरून कंत्राटदारांचे असे काम  मनपा अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे की वाढत्या दलालीमुळे झाला, हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

याला मनपाच्या अधिकार्‍यांबरोबर नगरसेवकही जबाबदार असल्याचा संशय येतो. यामुळेच कंत्राटदारांना अधिकार्‍यांची भीती आहे, ना नगरसेवकांची, अशी अवस्था निर्माण झालेली आहे. 

शहरातील नव्याने बांधलेल्या गटारींचा विषय घेतला तर त्यामधून सांडपाण्याचा निचरा होत नसल्याचे स्पष्ट दिसून येते. सांडपाणी गटारीतच साचून राहते. यामुळे शहरामध्ये डासांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत असून चिकुनगुनिया, डेंग्यु व हिवतापचे रुग्ण वाढत आहेत. मनपा दरवर्षी घरपट्टीद्वारे नागरिकांकडून कोट्यवधी रु.चा निधी वसूल करते. परंतु मनपाचे दवाखाने डॉक्टर व कर्मचार्‍यांअभावी बंद पडल्यामुळे  सर्दी, खोकल्यावरसुद्धा रुग्णांना गोळ्या देण्याची व्यवस्था मनपाकडे नाही. रोग उद्भवलाच तर प्राथमिक आरोग्य केंद्राकडे किंवा उपकेंद्राकडे जा, असा सल्ला मनपाकडून नागरिकांना दिला जातो. तेथील उपचारामुळे बरे वाटत नसेल तर जिल्हा इस्पितळात जाऊन उपचार घ्या, असे सुचविण्यात येते. असे असेल तर मनपा कशासाठी नागरिकांकडून आरोग्य कर वसूल करते, असा प्रश्‍न नागरिक करतात. 

शहरातील रस्त्यांची दुरुस्ती व डांबरीकरणाची कामेही निकृष्ट आहेत. पहिल्याच पावसात डांबरीकरण केलेल्या रस्त्यांवर खड्डे पडण्यास सुरूवात होते व अतिवृष्टीमुळे वाताहत झाल्याची तक्रार कंत्राटदारांकडून व अधिकार्‍यांकडून केली जाते. परंतु खरे कारण निकृष्ट दर्जा असल्याचे स्पष्ट होते. शहरामध्ये बांधण्यात आलेल्या सी.डी. वर्क्सच्या कामाची पद्धतही जगावेगळी आहे. प्रथम सी.डी. वर्क्स करण्यात येते. त्यामधून गटारीतील पाण्याचा निचरासुद्धा होऊ शकत नाही. त्याकरिता पुन्हा सी.डी. वर्क्स फोडून पुन्हा उंच सी. डी. बांधली जाते. त्यामुळे वायफळ पैसा मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. बांधकामाचे आवश्यक तंत्रज्ञान मनपा अभियंते विसरल्याचे दिसून येते. 

शहरातील केरकचर्‍याची उचल, त्याची वर्गवारी व गटारी आणि नाल्याची स्वच्छता मनपाकडून व्यवस्थितरीत्या केली जात नाही. त्यामुळेच शहरात रोगराईने डोके वर काढले आहे. त्याबद्दल मनपा आयुक्त किंवा आरोग्याधिकार्‍यांनी किती स्वच्छता कंत्राटदारांवर कारवाई केली, त्यांना चोख काम करण्यास बजावले, असे कोठेही आढळून येत नाही. त्या कारणामुळेच स्वच्छता कंत्राटदार निविदेतील तरतुदीनुसार नव्हे तर स्वतःच्या मर्जीप्रमाणे शहर स्वच्छतेचे काम करीत असल्याचे दिसून येते.

यावरून स्वच्छता कंत्राटदारांना धारेवर धरण्याचे व त्यांच्याकडून काटेकोर काम करून घेण्यासाठी कोणतेच प्रयत्न करीत नाहीत. स्वच्छतेसंबंधीच्या नागरिकांच्या तक्रारीमध्ये वाढ झालेली आहे. त्यांची बिले अदा करताना ठराविक कमिशन वसूल केले जाते, असे उघडपणे बोलले जाते. यामुळे कंत्राटदारांकडून कमिशन नेमके कोण वसूल करते, याचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.