होमपेज › Belgaon › ‘पीओपी’वरून वादंग

‘पीओपी’वरून वादंग

Published On: Aug 24 2018 12:41AM | Last Updated: Aug 24 2018 12:05AMबेळगाव : प्रतिनिधी

पीओपी मूर्ती जप्‍त करण्याची पूर्वतयारी म्हणून महापालिकेने गुरुवारपासून शहरात पीओपी मूर्तींचा शोध सुरू केला. मूर्तिकारांच्या कार्यशाळेत जाऊन महापालिकेचे पथक पीओपीचा शोध घेत होते. त्यामुळे मूर्ती जप्‍त केल्या जात आहेत, अशी अफवा गुरुवारी शहरभर पसरली होती. त्यामुळे मूर्तिकारांमध्ये भीती आहे. तर बेळगाव उत्तर आणि दक्षिणचे आमदार अ‍ॅड. अनिल बेनके आणि अभय पाटील यांनी जिल्हा प्रशासनाची भेट घेऊन पीओपी मूर्ती जप्‍तीला विरोध केला. त्यामुळे पीओपीवरून शहरातील वातावरण तापले आहे.

पीओपीच्या एकूण किती मूर्ती बेळगावात आहेत, हे निश्‍चित केल्यानंतर या मूर्ती जप्त केली जाण्याची शक्यता आहे. बेळगावात सकाळपासून महानगरपालिकेच्या मार्फत पीओपी मूर्तीचा सर्वेक्षण करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. मूर्तिकार, व्यापार्‍याचे नाव, मोबाईल नंबर, पत्ता, विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या मूर्तींची संख्या याची माहिती जमविण्याचे काम दिवसभर सुरू होते. 

कारवाईच्या धास्तीने काही विक्रीकेेंद्रे बंद ठेवल्याने महापालिकेच्या अधिकारी वर्गाला सर्वच मूर्ती विक्री करणार्‍यांची नावे, पत्ता, मोबाईल नंबर मिळू शकला नाही. काही व्यापार्‍यांनी विक्री केंद्र बंद ठेवून माहितीसाठी लावण्यात आलेला फलक काढून ठेवून अन्य गावी जाणे पसंत केले. 

सोमवारी जिल्हाधिकार्‍यांनी इशारा दिल्यानंतर दोन दिवस कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे कारवाई लांबणीवर पडली अशी चर्चा होती. मात्र, पीओपीच्या मूर्तीच्या सर्वेक्षण करण्यास सुरुवात झाल्याने प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे मूर्तिकार व मूर्ती विक्रेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. मूर्तिकार व विक्रेत्यांच्या बैठकीचे आयोजन शनिवारी (दि. 25) महानगरपालिकेत करण्यात आल्याची माहिती मूर्तिकारांनी दिली.