Wed, May 22, 2019 22:19होमपेज › Belgaon › पीओपी कारवाई ठरणार वादग्रस्त

पीओपी कारवाई ठरणार वादग्रस्त

Published On: Aug 23 2018 1:26AM | Last Updated: Aug 23 2018 12:39AMबेळगाव : प्रतिनिधी

जिल्हाधिकारी एस. झियाऊल्ला यांनी सोमवारपासून पीओपीवर कारवाई करण्याचे संकेत दिले होते. मात्र दोन दिवस उलटले तरी पीओपी मूर्तीवर कारवाई झाली नाही. गणेशोत्सव महामंडळाने जिल्हाधिकार्‍यांची मंगळवारी भेट घेतली असून पीओपी मूर्तींवर कारवाई करु नये, यासाठी प्रयत्न करीत आहे. बुधवारी  बकरी ईद सुट्टीमुळे कारवाई लांबणीवर पडली असून संभ्रम निर्माण झाला आहे. गतवर्षी तत्कालीन जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी पीओपी मूर्तींविरोधात कारवाई केली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात घडामोडी घडल्या. गणेशभक्त, सार्वजनिक मंडळाचे कार्यकर्ते, मूर्तिकार प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरल्यानंतर प्रशासनाने मवाळ भूमिका घेत कारवाई तूर्तास मागे घेतली होती.

जिल्हाधिकारी एस. झियाऊल्ला यांनी सोमवार दि. 20 रोजी बैठक घेऊन पीओपी मूर्ती जप्त करण्याचा इशारा दिला. त्यानंतर मूर्तिकार व व्यापारी वर्गाने मूर्ती जप्तीची धास्ती घेत मंगळवारी दुकाने दिवसभर बंद ठेवली होती. परराज्यातून तयार पीओपी मूर्ती आणून विकणारे व्यापारी अडचणीत सापडले आहेत. अनेकांनी लाखो रुपयाची गुंतवणूक केली आहे. श्रावण महिन्यात कोल्हापूरहून पीओपी मूर्ती आणणार्‍या मूर्तिकारांनी कारवाईची धास्ती घेत मूर्ती आणणे टाळले आहे. त्यामुळे कोल्हापूरातील मूर्ती बनविण्याच्या कारखान्यांवरदेखील त्याचा परिणाम झाला आहे. 

गतवर्षी कारवाईला प्रारंभ होताच मूर्तिकार संघटनेने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर केले. मूर्तिकारांची बैठका झाल्या. जिल्हाधिकार्‍यांनी या काळात मूर्तिकारांना नोटिसा बजावल्या. गणेशोत्सव महामंडळाने स्वतंत्र बैठक घेऊन  पीओपीविरोधात कारवाई होऊ नये म्हणून महत्वाची भूमिका बजावली  होती. जिल्हाधिकारी, आयुक्त व प्रदूषण मंडळाना निवेदनामार्फत विनंती केली. प्रशासनाविरोधात  मोठ्या प्रमाणात गणेशभक्त रस्त्यावर उतरल्यामुळे प्रशासनाला नमते घ्यावे लागले होते.यंदा जिल्हाधिकार्‍यांनी आदेश दिल्यामुळे ऐन गणेशोत्सव काळात उलटसुलट चर्चा सुरु आहे. गणेशोत्सव महामंडळ प्रशासनाच्या संपर्कात असून कारवाई थांबविण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. 

कृत्रिम टंचाई निर्माण होणार

अवघ्या 20 दिवसावर गणेशोत्सव येऊन ठेपल्यानंतर पीओपी मूर्ती जप्तीचा इशारा जिल्हाधिकार्‍यांनी दिला आहे. त्यामुळे सगळीकडे खळबळ माजली असून गणेशभक्त  संताप व्यक्त करत  आहेत. मूर्ती जप्त केल्या तर मूर्तीची कृत्रिम टंचाई निर्माण होईल. एवढ्या मोठ्या प्रमाणात शाडूच्या मूर्ती उपलब्ध होणे शक्य नाही. बेळगावमध्ये हाताच्या बोटावर मोजण्याइतके शाडू मूर्तिकार आहेत.  

इकोफ्रेंडली मूर्ती प्रात्यक्षिक 

कोल्हापूर कन्या मंडळातर्फे गणेशोत्सवाचे औचित्य साधून इको फे्रंडली गणेश मूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिक अनिरूद्ध आदेश पथक यांनी बुधवारी (दि.22) दाखविले.  गोवावेस येथील रोटरी जलतरण सभागृहामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

पाहुण्यांचे स्वागत मंडळाच्या अध्यक्षा मालविका कलघटगी यांनी केले. पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. इको फ्रेंडली मूर्ती तयार करण्यासाठी कागदाचा लगदा, डिंक आणि व्हाईटनिंग पावडर यांचे मिश्रण लागते. तसेच रंग कामासाठी फूड कलर वापरले जातात. हा गणपती विर्सजन केल्यानंतर लवकर विरघळतो. त्यामुळे पाणी दूषित होत नाही. 

यावेळी प्रमुख पाहुण्या पूनम लेंगडे, ज्योती देवलापूर, रंजना लेंगडे, नीलम पवार उपस्थित होत्या. सूत्रसंचालन शिल्पा हंजी यांनी केले. रमा देसाई यांनी आभार मानले.