Tue, Feb 19, 2019 16:14होमपेज › Belgaon › मंत्रिपदासाठी यापुढेही आंदोलन : सतीश जारकीहोळी 

मंत्रिपदासाठी यापुढेही आंदोलन : सतीश जारकीहोळी 

Published On: Jun 15 2018 1:04AM | Last Updated: Jun 14 2018 9:11PMबेळगाव : प्रतिनिधी

युती सरकारमध्ये मंत्रिपद देण्यात येईल, असा आपल्याला विश्‍वास होता. परंतु मंत्रीपद नाकारल्याने विश्‍वासघात झाला आहे. अर्थात असा प्रकार केवळ काँग्रेस पक्षातच घडतो असे नाही, तर सर्वच राजकीय पक्षामध्ये अशा घडामोडी चाललेल्या असतात. तरीही दुसर्‍या फेरीत मंत्रिपद मिळावे, यासाठी आंदोलन सुरूच राहील, अशी माहिती आ. सतीश जारकीहोळी यांनी दिली.

महापौर चेंंबरमध्ये पत्रकारांशी बोलताना आ. जारकीहोळी म्हणाले, मला मंत्रिपद मिळावे यासाठी आपण व आपले हितचिंतक यापुढेही आंदोलन तीव्र करणार आहे. मंत्रिमंडळाच्या द्वितीय टप्प्यातील विस्तारामध्ये आपल्याला स्थान मिळेल, या प्रतीक्षेत मी आहे.  सध्या आपण आपल्या मतदार संघाच्या विकासावर लक्ष केंद्रित करणार आहे.

जारकीहोळींना मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या फेरीत स्थान मिळाले नाही. त्यामुळे ते व त्यांचे समर्थक नाराज आहे. जारकीहोळींनी तर अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिवपदाचा राजीनामाही पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पाठवून दिला आहे. दुसर्‍या टप्प्यातील विस्तारात स्थान न मिळाल्यास ते काँग्रेसमधून बाहेर पडण्याचीही शक्यता आहे. 

गेल्या मंत्रिमंडळात सतीश अबकारी मंत्री आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री होते. मात्र त्यांचा कारभार व्यवस्थित नसल्याच्या तक्रारी आल्यानंतर शेवटच्या टप्प्यात त्यांच्याकडून मंत्रिपद काढून घेऊन ते त्यांचे बंधू रमेश जारकीहोळींना देण्यात आले. यंदाही त्याचप्रमाणे पहिल्या टप्प्यात सतीश यांना मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा होती. मात्र पुन्हा त्यांच्या बंधूंनीच बाजी मारली. मंत्रिपद रमेश यांनाच मिळाले.

त्यावरून सतीश नाराज आहेत. शहरातील नाले सफाईबद्दलही त्यांनी चौकशी केली व ते नाले तातडीने स्वच्छ करावेत, असे सांगितले. मनपाच्या जेसीबीबद्दलही त्यांनी चौकशी केली व मनपाने नवीन जेसीबी खरेदी करण्याची सूचनाही त्यांनी आयुक्तांना केली. यावेळी महापौर बसाप्पा चिक्कलदिनी, उपमहापौर मधुश्री पुजारी, माजी महापौर शिवाजी सुंठकर,  किरण सायनाक, एपीएमसीचे अध्यक्ष निंगाप्पा जाधव, नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या. 

कामांबाबत चौकशी

महापालिकेला भेट दिल्यानंतर सतीश यांनी बेळगाव शहरातील खानापूर रोड रेल्वे उड्डाण पुलाच्या कामकाजाची त्यांनी मनपा आयुक्त कृष्णेगौडा तायण्णावर व शहर अभियंता आर. एस. नाईक यांच्याकडे चौकशी केली. अभियंता नाईक यांनी सप्टेंबर अखेरपर्यंत त्या पुलाचे बांधकाम पूर्ण होणार असल्याचे सांगितले.